बाल वैज्ञानिक स्पर्धेत कृष्णा पाटीलला सुवर्ण पदक तर पार्थ बहुगुणे रौप्यपदक विजेता

अमळनेर (प्रतीनिधी) डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत राज्यभरातील 65 हजार विद्यार्थ्यांमधून येथील सेंट मेरी शाळेच्या कृष्णा गोविंद पाटील याने सुवर्णपदक तर पार्थ निखिल बहुगुणे याने रौप्यपदक मिळविले आहे. यानिमित्ताने प्रथमच अमळनेरला हा बहुमान मिळाला आहे. 9 रोजी माटुंगा येथे डॉ होमी भाभा रिसर्च सेंटर च्या प्राध्यापकांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

मराठी माध्यमाच्या व इंग्रजी माध्यमाच्या ग्रामीण व शहरी मुलांमध्ये वैज्ञानिक आवड निर्माण व्हावी व त्यांच्यातील संशोधक वृत्ती वाढून चांगले संशोधक निर्माण व्हावेत, म्हणून मुंबई येथील विज्ञान शिक्षक संघटनेकडून दरवर्षी डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा 6 वी व 9 वि च्या मुलांसाठी घेतली जाते. तीन पातळीवर ही स्पर्धा घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक ज्ञानाची कसोटी लागत असते. या वर्षी राज्यातून 65 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात प्रथम जिल्हा पातळीवर जळगाव येथे लेखी परीक्षा घेण्यात आली. तेथील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पुणे येथे घेण्यात आली. त्यात उत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना एका विषयावर संशोधन प्रकल्प देण्यात आला होता. त्यात रानभाज्यांचे महत्व हा विषय देण्यात आला होता. कृष्णा गोविंद पाटील याने “सुरण” या भाजीची निवड केली होती त्यात त्याने शेतकऱ्यांची मुलाखत , त्यातील औषधी गुणधर्म , त्याचे संवर्धन याचे वैज्ञानिक दाखले देऊन 40 पानांचा प्रकल्प सादर केला होता. त्याला सुवर्णपदक देऊन त्याचा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होमीभाभाचे भौतिक शास्राचे प्राध्यापक जोशी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले . तर पार्थ निखिल बहुगुणे याने “कटरले” या भाजीची निवड करून संशोधन प्रकल्प सादर केला होता. त्यानेही रौप्य पदक प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे दोघे अमळनेर सेंट मेरी शाळेचे विद्यार्थी असून दोघे डॉक्टर पुत्र आहेत. कृष्णा हा ग्रामीण रुग्णलायचे वैद्यकीय अधिकारी डॉ जी.एम.पाटील यांचा तर पार्थ हा डॉ निखिल बहुगुणे यांचा मुलगा आहे. दोघांच्या यशाबद्दल शाळेच्या व्यवस्थापन , अमळनेर तालुका डॉक्टर संघटना तसेच शिक्षक संघटनांनी अभिनंदन केले आहे.

Add Comment

Protected Content