Home क्रीडा राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राची क्रिशा जैन आणि दिल्लीचा आरित कपिल ठरले विजेते 

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राची क्रिशा जैन आणि दिल्लीचा आरित कपिल ठरले विजेते 


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव येथील जैन हिल्समध्ये आयोजित ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप शनिवारी उत्साहात पार पडला. अकरा दिवस चाललेल्या या अत्युच्च दर्जाच्या बुद्धिबळ स्पर्धेत देशभरातील ३९२ मुले आणि १७७ मुलींनी सहभाग घेतला होता. अखेरच्या निर्णायक फेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्रातील क्रिशा जैन हिने, तर मुलांच्या गटात दिल्लीच्या आरित कपिल याने राष्ट्रीय विजेतेपद पटकावत आपली बुद्धिबळ क्षमतेची छाप सोडली.

मुलींच्या अंतिम फेरीत तामिळनाडूच्या पूजा श्री हिचा पराभव करत क्रिशा जैन हिने ९ गुणांसह विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. तिला ७० हजार रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. दुसऱ्या स्थानी केरळची दिवी बिजेश (९ गुण) आणि तिसऱ्या स्थानी तामिळनाडूची पूजा श्री (९ गुण) ठरल्या. अनुक्रमे ६० हजार व ५० हजार रुपयांची पारितोषिके त्यांना देण्यात आली. पाचव्या क्रमांकापर्यंतच्या मुलींमध्ये त्रिपुराची आराध्या दास आणि झारखंडची दिक्षिता डे यांचा समावेश होता. सातव्या क्रमांकापासून ते वीसाव्या क्रमांकापर्यंतच्या सर्व खेळाडूंना प्रत्येकी दहा हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले.

मुलांच्या गटात दिल्लीच्या आरित कपिल याने ९.५ गुण मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्याला पश्चिम बंगालच्या नरेंद्र अग्रवालकडून पराभव स्विकारावा लागला, परंतु सर्वाधिक गुणांमुळे त्याने पहिले स्थान मिळवले. दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालचा वोशिक मंडल (९ गुण) आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राचा अद्वित अग्रवाल (८.५ गुण) राहिला. चौथ्या व पाचव्या क्रमांकावर नरेंद्र अग्रवाल आणि मनी सरबोथो यांनी स्थान मिळवले. या सर्व विजेत्यांना अनुक्रमे ६० हजार, ५० हजार, ४० हजार आणि २५ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेतील समारोप व पारितोषिक वितरण सोहळा जैन हिल्सच्या अनुभूती मंडपममध्ये पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अजितकुमार वर्मा, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, तजाकिस्तानचे ग्रँडमास्टर फारुक अमातोव, मुख्य पंच देवाशीष बारुआ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे फारुक शेख, राजेंद्र कोंडे, नंदलाल गादिया आदी मान्यवर उपस्थित होते. खेळाडूंना रोख पारितोषिकांसह प्रमाणपत्रे, सन्मानचिन्हे देण्यात आली. गांधी रिसर्च फाउंडेशनने पर्यावरणपूरक राखी स्टॉल लावून वेगळा सामाजिक संदेश दिला.

पारितोषिक वितरणप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पालकांनी मुलांवर तणाव न आणता त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. ग्रँडमास्टर फारुक अमातोव यांनी स्पर्धेचे नियोजन उत्कृष्ट असल्याचे सांगून जैन हिल्सचा परिसर खेळाडूंना प्रेरणादायी ठरल्याचे मत व्यक्त केले.


Protected Content

Play sound