‘कोरेगाव भिमा’ : बुद्धिवंतांसह कार्यकर्त्यांना गोवण्यामागे एका एनजीओचा हात?

download 2

मुंबई (वृत्तसंस्था) कोरेगाव भीमा प्रकरणात मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना गोवण्यामागे एका एनजीओचा हात, असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गृह खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेच शरद पवारांना या प्रकरणाबाबत पूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी कोरेगाव भीमा प्रकरणात मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर चुकीचे गुन्हे दाखल केल्याची टीका होती, असे पवार यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. एका दैनिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स’ ने दिलेल्या वृत्तानुसार शरद पवार यांच्या निकटवर्तीयांशी बोलले असता त्यांनी सांगितले की, गृह खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेच शरद पवारांना या प्रकरणाबाबत पूर्ण माहिती दिली. या माहितीनुसार संबंधित कार्यकर्त्यांना या प्रकरणात गोवण्यामागे ‘थिंक टँक’ म्हणून काम करणाऱ्या एका एनजीओचा मोठा हात होता. त्यामुळेच अनेक कार्यकर्त्यांना कारणाशिवाय या प्रकरणात गोवले गेले, अशी माहिती या अधिकाऱ्याने पवार यांना दिल्यानंतर त्यांना या प्रकरणातील गांभीर्य लक्षात आले व त्यामुळेच त्यांनी ही भूमिका घेतली आहे.

 

कोरेगाव भीमा येथील हिंसाचारानंतर अर्बन नक्षल असल्याच्या आरोपाखाली सुधा भारद्वाज यांच्यापासून ते शोमा सेन यांच्यापर्यंत अनेक नामवंत बुद्धिवंत, काही वकील व दलित हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडले होते. आनंद तेलतुंबडे व गौतम नवलाखांसारख्या बुद्धिवंतांचाही ताबा घेण्यासाठी पोलिस न्यायालयात गेलेले आहेत. कोरेगाव भीमा प्रकरणात अटक केलेल्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यात येत असल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. मात्र, हा आरोप निखालस खोटा असल्याची व पोलिस तशा प्रकारचे कोणतेही पुरावे सादर करू शकत नसल्याची टीका तेव्हा मानव अधिकारांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी केली होती. आता शरद पवार यांनी या प्रकरणी थेट पकडलेल्या कार्यकर्त्यांची बाजू घेतल्याने या प्रकरणातील वेगळी बाजू समोर येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

Protected Content