मुंबई प्रतिनिधी । ठाणे लोकलमधील वाढत्या गर्दीनं आज आणखी एक बळी घेतल्याची घटना घडली आहे. कोपर-दिवा स्थानकादरम्यान गाडीतून पडून एका तरुणीचा मृत्यू झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, सविता नाईक (वय 30) मृत्यु तरुणीचे नाव आहे. सविता या डोंबिवलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसला जाणाऱ्या जलद लोकलमधून प्रवास करत होत्या. गाडीत नेहमीप्रमाणं प्रचंड गर्दी होती. लोकल कोपर-दिवा स्थानकांच्याजवळ असतांना तोल जाऊन त्या पडल्या, अशी प्रथमदर्शनी माहिती आहे. या दुर्घटनेनंतर जीआरपीएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरू आहे. सविताचा मृतदेह थोड्याच वेळात त्यांच्या कुटुंबीयांना सोपविण्यात येणार आहे. ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये नेहमीच प्रचंड गर्दी असते. कार्यालयीन वेळेत गाडीत चढायलाही जागा नसते. यातून अपघाताचे प्रकार घडतात. रेल्वे प्रशासनानं याची तातडीनं दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.