सर्वाधिक गर्दीच्या शहरांच्या यादीत कोलकाता प्रथम; महाराष्ट्रातून ‘हा’ शहर प्रथम

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या काही वर्षांत भारतातील शहरांमध्ये गर्दी वाढत जातेय. या गर्दीचा ताण वाहतुकीवर होतो. भारतातील विविध शहरे विविध क्षेत्रांसाठी ओळखली जातात. शिक्षणनगरी ते आयटी पार्कसारखी शहरे उभी राहिली आहेत. यानिमित्ताने त्या शहरात वास्तव्यास जाणाऱ्यांचीही संख्या झपाट्याने वाढत जाते. डच लोकेशन टेक्नॉलॉजीने तज्ज्ञ टॉमटॉमने केलेल्या सर्वेक्षणातून भारतात २०२४ मध्ये सर्वात गर्दीचे शहर कोलकाता ठरले आहे. तर, या पाठोपाठ बंगळुरू आणि पुण्याचा क्रमांक लागतो.

२०२३ मध्ये बंगळुरू हे भारतातील सर्वाधिक गर्दीचं शहर होतं. परंतु, २०२४ मध्ये कोलकाताने बंगळुरूला मागे टाकलं असून देशातील सर्वांत गर्दीचं शहर म्हणून नाव कोरलं आहे. गेल्यावर्षी १० किमी अंतर कापण्यासाठी कोलकातामधील चालकांना सरासरी ३४ मिनिटे आणि ३३ सेकंदांचा कालावधी लागत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याच अंतरासाठी बंगळुरूत सरासरी ३४ मिनिटे आणि १० सेकंदांचा वेळ लागतो. २०२४ मध्ये कोलकात्याचा सरासरी वेग १७.४ किमी प्रतितास होता, त्याच कालावधीत बेंगळुरूने १७.६ किमी प्रतितास इतका सरासरी वेग नोंदवला.

भारतात इतर गर्दीची शहरे हैदराबाद, चेन्नई आणि मुंबई आहे. या शहरांत १० किमी प्रवासासाठी अनुक्रमे ३२ मिनिटे, ३० मिनिटे आणि २९ मिनिटे सरासरी प्रवास वेळ आहे. अहमदाबाद, एर्नाकुलम आणि जयपूर सारखी शहरे देखील गर्दीची शहरे म्हणून उदयास येत आहेत. अहमदाबाद आणि एर्नाकुलममध्ये १० किमीसाठी २९ मिनिटे लागतात तर, जयपूरला २८ मिनिटे लागतात. महत्त्वाचं म्हणजे दिल्लीला १० किमी प्रवासासाठी २३ मिनिटे लागतात.

भारतात कोलकाता, बेंगळुरूनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. पुण्याचा सरासरी वेग १० किमीसाठी ३३ मिनिटे आहे. तर तिन्ही शहरांचा समावेश जागतिक गर्दीच्या शहरांमध्येही होतो. कोलकाता जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर बेंगळुरू आणि पुणे यांनी २०२४ मध्ये सरासरी १८ किमी प्रतितास वेगाने १० किमी अंतर कापण्यासाठी ३३ मिनिटे आणि २२ सेकंदांचा प्रवास असल्याने अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान मिळवले. या यादीतील पहिले युरोपीय शहर लंडन पाचव्या क्रमांकावर आहे.

Protected Content