यावल प्रतिनिधी । रिक्षा बाजूला करण्याच्या वादातून चाकू हल्ला झाल्याची घटना येथे घडली असून यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
येथे शहरातील वर्दळीच्या चौकातील दुकानासमोरील रिक्षा पुढे काढून घे असे सांगितल्याचा राग येऊन प्रवासी रिक्षा मालकाने दुकान मालकाचे गळ्यावर चाकूने वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना शुक्रवारी (ता.१२) दुपारी चारच्या सुमारास घडली असुन या घटने बाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सागर अशोक देवांग यांच्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी नवाज अली नियाज अली ( रा.बाबूजीपूरा यावल) याने त्याचे मालकीची प्रवासी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्हि ५५४५) महेश अशोक देवांग यांचे दुकाना समोर उभी करून ठेवली होती. महेश देवांग यांनी ‘सदरची रिक्षा पुढे काढून घे’ असे नवाज अली यास सांगितले असता त्याचा राग येऊन नवाज अली नियाज अली याने महेश देवांग यास शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण करून महेश चे गळ्यावर चाकूने वार करून मारहाण करीत दुखापत केली.
संशयित नवाज अली याचे विरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजमल पठाण व पोलिस हवालदार संजय तायडे आदी पोलीस कर्मचारी हे करीत आहेत.