पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा विधानसभा मतदारसंघातून किशोर पाटील यांना पहिल्या फेरीत आघाडी मिळाली आहे. तर वैशाली सुर्यवंशी हे पिछाडीवर असल्याचे दिसून आले आहे.
पाचोरा विधानसभा मतदारसंघात यंदा बहुरंगी लढत झाली. विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांना त्यांच्याच चुलत भगिनी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी आव्हान दिले. आप्पा हे शिंदे गटाकडून तर वैशालीताई या उबाठाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. यासोबत भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल केली. तर माजी आमदार दिलीप वाघ यांनी देखील अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली. यासोबत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ख्यात असलेले प्रतापराव हरी पाटील हे देखील स्वराज्य पक्षाच्या तिकिटावर मैदानात उतरल्यामुळे येथील लढत अत्यंत चुरशीची झाली.
पाचोरा विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या काळात मोठी चुरस दिसून आली. विविध उमेदवारांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. प्रचाराच्या काळात आमदार किशोर पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासाठी आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, नितीन बानुगडे पाटील आदींच्या सभा झाल्या. तर प्रत्येक उमेदवाराने जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार फेऱ्या देखील काढल्या.
दरम्यान, आज पहिल्याच फेरीत आमदार किशोरआप्पा पाटील यांना जोरदार आघाडी मिळाली आहे. यात त्यांना ४१२५ मते मिळाली असून अमोल शिंदे यांना १९१७ वैशाली सुर्यवंशी यांना १४८४ मते मिळाली आहे.