पाचोरा प्रतिनिधी । येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी किरण पाटील हा सिल्व्हर झोन फाऊंडेशन नवी दिल्ली व्दारा आयोजित इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ऑफ सायन्स- २०२०-२१ या परिक्षेत देशातून प्रथम आला आहे.
सिल्व्हर फाऊंडेशन ही एक शैक्षणिक खाजगी संस्था असून दिल्ली येथे स्थित आहे. मागील १७ वर्षांपासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विषयांवर आधारीत परीक्षांचे आयोजन यशस्वीपणे करीत असते. यावर्षी जानेवारी – २०२१ मध्ये इंटरनॅशनल ऑलिम्पियाड ऑफ सायन्स ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत निर्मल इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी किरण संजीव पाटील हा देशात पहिला आला आहे. त्याचा रॉ स्कोर १०० असून एकूण मार्क १०० आहेत. त्याची क्लास, झोनल व ऑलिम्पियाड रँक – १ आहे. याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यानिमित्ताने स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांचे स्वप्न साकार होतांना दिसत आहे. त्यांनी या स्कूलची पायाभरणी करतांना सांगितले होते की, या स्कूल मधून नामवंत शास्त्रज्ञ, वैमानिक, डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील व नामवंत कलाकार इत्यादी घडावेत आणि त्यांनी देशाची सेवा करावी. ज्ञान आणि प्रतिभेच्या जोरावर आता देशातून प्रथम येणे ही त्यांच्या स्वप्नांची एक प्रकारे पुर्तीच आहे. किरण पाटील या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन करुन पुन्हा एकदा निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शालेय शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे व प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. तसेच परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.