खान्देश पुनर्विवाह ग्रुपतर्फे विधवा महिलांचे पुनर्विवाह

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | खान्देश पुनर्विवाह ग्रुपच्या माध्यमातून विधवा महिलांचे पुनर्विवाह करण्याचे महान कार्य जि.प. जळगावचे सेवानिवृत्त अधिक्षक भास्कर पाटील करत असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील खर्डे गावातील विधवा मुलीचा नुकताच पुनर्विवाह पार पडला.

तालुक्यातील जानवे येथील मूळ रहिवासी असलेले जिल्हा परिषद जळगावचे सेवानिवृत्त अधिक्षक भास्कर पाटील हे सेवानिवृत्तीनंतर आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो ही उदार भावना मनात ठेवून त्यांनी एक विशेष काम हाती घेतले आहे. समाजाच्या प्रत्येक घटकात विधवा महिलांचे पुनर्विवाह न करण्याच्या पारंपरिक कृप्रथा आजही समाजात सुरू आहेत. पण आयुष्याच्या वाटेवर अल्पवयात महिलांवर विधवा होण्याची वेळ येते व संपूर्ण आयुष्य घराच्या चौकटीत समाजाच्या बंधनात अडकून घुसमटतेने आयुष्य काढत असतात ही बाब त्यांच्या मनात घर करून बसली होती आणि समाजात विधवा महिलांबाबत मतपरिवर्तन व्हावे व त्यांचे पुनर्विवाह व्हावे, यासाठी सोशल मीडियाच्या वापर करून व्हाट्सअपच्या माध्यमातून त्यांनी ग्रुप निर्माण करून समाजातील प्रत्येक घटकांतील विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना एकत्रित आणले आणि त्या माध्यमातून समाजात असलेल्या विधवा महिलांची माहिती घेऊन विधवा महिलांचे पुनर्विवाह करण्याची चळवळ सुरू झाली.

या चळवळीला पाच ते सहा वर्षाचा कालावधी उलटून त्यांनी आतापर्यंत जवळपास पन्नासच्या घरात विधवा महिलांचे पुनर्विवाह करण्याचे पुण्यरूपी काम केलं आहे. असाच एक पुनर्विवाह नंदुरबार जिल्ह्यातील खर्डे गावांतील तुकाराम पाटील यांची विधवा मुलगी रीना हीचा नंदुरबार जिल्ह्यातीलच बहयाने येथील रहिवासी चैत्राम पाटील यांच्याशी संपन्न झाला. अनेक निराधार अपत्यांना पुनर्विवाहच्या माध्यमातून आई-वडील देण्याचे महान कार्य भास्कर पाटील करत आले आहेत. आणि त्यांच्या ह्या स्तुत्य कार्याचा अनेक विविध संस्था व राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या ह्या कार्याला प्रत्येक समाजातील घटकाने प्रतिसाद द्यावा असे प्रा.देवराम पाटील यांनी आवाहन केले आहे.

Protected Content