खामगाव येथे ‘प्रोजेक्ट ओ-२’ अंतर्गत १०० वृक्षांचे रोपण ! (व्हिडीओ)

buldhana

खामगाव, प्रतिनिधी | मुक्तांगण फाऊंडेशनतर्फे दि.२१ जुलै २०१९ रोजी येथील फक्कड देवी गौरक्षण परिसरात डॉ. कालिदास थानवी यांच्या पुढाकारातून स्थानिक नागरिक व मुक्तांगण चमूच्या वतीने १०० वृक्षांचे रोपण करण्यात येवून ट्री-गार्डही लावण्यात आले.

मानवाला निसर्गाशिवाय पर्याय नाही, आपण कितीही प्रगती केली तरी अन्न, हवा व पाणी या मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत, या गरजा निसर्ग विनामूल्य पुरवत असतो. माणूस मात्र अत्यंत लोभी प्राणी असल्यामूळे त्याने आपल्या गरजा अवास्तव करुन ठेवल्या आहेत आणि यातूनच निसर्गाला तो अतोनात हानी पोहचवत आहे. निसर्गाचे आपण काही परत देणे लागतो, ही भावना फार कमी लोकांमध्ये असून ते काम तुरळक लोक करतांना दिसतात. हे प्रमाण वाढावे यासाठी डॉ. थानवी यानी ‘प्रोजेक्ट ओ-२’ (Project O2) ही अभिनव संकल्पना अमलात आणली आहे. माणसाला सर्वात जास्त गरज असते ती ओक्सिजनची व ती गरज फक़्त झाडेच पुरवतात म्हणून ही झाडे जगवणे काळाची गरज आहे. मुक्तांगण ही संस्था नेहमीच पर्यावरणाच्या कार्यात अग्रेसर असते, त्यामूळे ह्या प्रकल्पा अंतर्गत वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याचवेळी केवळ वृक्षारोपण करुन चालणार नाही तर त्याचे संवर्धनही होणे गरजेचे आहे, त्यामूळे स्थानिक नागरिकांशी संवाद साधून वृक्ष लावण्यात आले आहेत. या झाडांचे संगोपन व्हावे, यासाठी फायबरचे ट्री-गार्डही बसवण्यात आले आहेत. या उपक्रमा अंतर्गत कडुलिंब, गुलमोहर, बहावा, चिंच, कारनेट, कडू बदाम, बेल, पिंपळ, जामुन आदी झाड़ांची लागवड करण्यात आली आहे. या उपक्रमात महिला मंडळी, लहान मुले मुली, स्थानिक तरुण यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कालिदास थानवी यांच्यासह स्थानिक नागरिक आणि मुक्तांगणच्या चमूने विशेष प्रयत्न केले.

Protected Content