
मुक्ताईनगर प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत उमेदवारी न मिळाल्याने एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांच्या संतापाचा विस्फोट झाल्याचे दिसून येत असून संतप्त कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला आहे.
आज भारतीय जनता पक्षाच्या १२५ उमेदवारांचा समावेश असणारी पहिली यादी जाहीर झाली आहे. यात माजी मंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या नावाचा समावेश नसल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांचे नाव दुसर्या यादीत असेल की नाही ? यावरून संशयकल्लोळ सुरू झाला आहे. दरम्यान, यानंतर एकनाथराव खडसे यांनी आपली काय चूक आहे ? असा सवाल केला. दरम्यान, आज सायंकाळी खडसे समर्थकांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी एकनाथराव खडसे यांच्या समर्थनासाठी ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. या माध्यमातून त्यांच्या समर्थकांनी आपला रोष व्यक्त केल्याचे दिसून आले. याप्रसंगी समर्थकांनी सामूहिक राजीनामे देण्याचा पवित्रा घेतला. आ. एकनाथराव खडसे यांनी समर्थकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र समर्थक संतप्त झाल्याचे दिसून येत आहे.