रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसेंनी माझ्यावर केलेले आरोप सिध्द करून दाखवावे, असे आव्हान आमदार शिरीष चौधरी यांनी दिले आहे. सत्यजित तांबे यांना निवडणूकीत मदत केल्याचा आरोप खडसेंनी केला होता. त्यावर आ. शिरीष चौधरी यांनी प्रत्युत्तर देत माजी मंत्री एकनाथराव खडसेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नुकत्याच झालेल्या नाशिक पदवीधर निडणूक पार पडली. या निवडणूकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शुभांगी पाटील यांनी निवडणूक लढविली होती. यात सत्यजित तांबे यांचा मोठा मताधिक्क्यांनी विजय झाला आहे. दरम्यान, निवडणूकीच्या प्रचार काळात यावल व रावेर तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी व डॉ. उल्हास पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम न करता अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना मदत केली असा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यावर एका कार्यक्रमात आमदार शिरीष चौधरी यांनी एकनाथ खडसे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी माझ्यावर आरोप करण्यापेक्षा निवडणूकी दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचे परिक्षण करावे, तसेच सत्यजीत तांबे यांना मदत करण्याचा आरोप एकनाथ खडसेंनी सिध्द करून दाखवावे असे आव्हान दिले आहे. आपण महाविकास आघाडीचे काम केल्याचे शेवटी आ. शिरीष चौधरी यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.