Home उद्योग जागतिक टपाल दिनानिमित्त पत्र लेखन स्पर्धेत ‘केतन पाटील’ राज्यात दुसरा

जागतिक टपाल दिनानिमित्त पत्र लेखन स्पर्धेत ‘केतन पाटील’ राज्यात दुसरा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ९ ऑक्टोबर जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने टपाल विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेत, येथील झांबरे विद्यालयाच्या आठवीतील विद्यार्थी केतन गिरीश पाटील याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावत एक मोठा मानाचा टप्पा गाठला. ‘समुद्र’ या विषयावर झालेल्या या स्पर्धेत केतनच्या विचारमांडणीने आणि लेखनशैलीने राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये आपली वेगळी छाप पाडली. या यशाबद्दल टपाल विभागाकडून केतनचा शाळेमध्ये विशेष सन्मान करण्यात आला.

या गौरव सोहळ्यात केतनला पोस्ट विभागातर्फे १० हजार रुपयांचा धनादेश, प्रशस्तीपत्र तसेच प्रभू श्रीरामांच्या विशेष टपाल तिकिटाचा गौरव म्हणून प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि लेखनकौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरला.

गौरव समारंभाच्या वेळी मुख्य डाक अधीक्षक मोहम्मद खदीर, सहाय्यक डाक अधीक्षक टी. एफ. तडवी, विकास अधिकारी सतीश पाटील, विपणन अधिकारी एस. व्ही. मुंडे, संतोष जलंकार यांच्यासह झांबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणीता झांबरे, संचालक डॉ. अशोक राणे आणि केतनचे पालक देखील उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी केतनच्या यशाचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळत असून, केतनने मिळवलेले यश संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे. पोस्ट विभागाच्या या उपक्रमामुळे नवोदित लेखकांना लेखनासाठी योग्य व्यासपीठ मिळाले आहे. शाळा स्तरावरून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग या निमित्ताने खुले झाला आहे.


Protected Content

Play sound