जळगाव, प्रतिनिधी | केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे श्रीराम रथोत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष होते. रविवारी शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह मंदिराच्या शेजारील स्व.दादाजी चौघुले क्रीडांगणात कुस्ती स्पर्धा संपन्न झाली.
या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, प्रतिष्ठानचे संचालक दीपक जोशी, कुस्ती समितीचे सदस्य दिलीप पाटील, राहुल वाघ, दिलीप कोळी, सुनिल शिंदे आदी उपस्थित होते. स्पर्धेची सुरुवात लहान मुलांच्या आणि मुलींच्या कुस्तीने झाली. या स्पर्धेत देशभरातील नावाजलेले मल्ल सहभागी झाले. विजेत्या स्पर्धकांसाठी ५ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. मध्यप्रदेश, दिल्ली, हरयाणा, झांसी, उत्तरप्रदेश मेरठसह महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर जिल्ह्यातील मल्ल मैदानात उतरले होते. स्पर्धेत प्रमुख ७ जोडींची कुस्ती ठेवण्यात आली होती. लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी विजेत्या स्पर्धकासह पराभूत स्पर्धकाला देखील बक्षीस देण्यात आले.