मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे राज्यात बहुतांश ठिकाणी ‘आनंदाचा शिधा’ किट पोहचले नसल्याची ओरड होत नसतांना दीपक केसरकर यांनी याबाबत केलेले भाष्य आता अनेकांच्या टिकेला आमंत्रण देणारे ठरले आहे.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना आज ‘आनंदाचा शिधा’ बहुतांश नागरिकांना मिळाला नसल्याबाबतची विचारणा करण्यात आली. यावर केसरकर म्हणाले की, मराठी लोकांची दिवाळी ही तुळशीच्या लग्नापर्यंत असते. त्यामुळे उशिरा का होईना पण ‘आनंदाचा शिधा’ घरोघरी पोहचेल, असे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केले.
शिंदे-फडणवीस सरकारने ‘आनंदाचा शिधा’ योजनेसंदर्भात केलेली घोषणा लोकप्रिय ठरली होती. राज्यातील जनता ‘आनंदाचा शिधा’ कधी मिळणार याकडे डोळे लावून बसली होती. परंतु, दिवाळी सुरु होऊनही अद्याप अनेक रेशन दुकानांमध्ये आनंदाचा शिधा पोहोचलेलाच नाही. यातच आता दीपक केसरकर यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्याने केलेले विधान हे वादाच्या भोवर्यात सापडले आहे. आनंदाचा शिधा तुळशीच्या लग्नापर्यंत मिळाला तर आधी याबाबतची माहिती का देण्यात आली नाही ? अशी विचारणा आता करण्यात येत आहे.