चैतन्य नगर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पाडवा पहाटेत भरले “भावमधुर स्वररंग”

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय संस्कृतीत अध्यात्मिकदृष्ट्या पाडवा पहाटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज 25 ऑक्टोबर रोजी, गुरुदत्त भजनी मंडळ, (हिरा शिवा कॉलनी) ज्येष्ठ नगर संघ, चैतन्य नगर जळगावतर्फे कलाकारांच्या सुमधुर गायनाने पाडव्याची पहाट भावमधुर स्वररंगांनी उजळून निघाली.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी फेसकॉमचे माजी अध्यक्ष डी.टी चौधरी,ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष के.के.भोळे, संयोजक तथा संघाचे अध्यक्ष पंडितराव सोनार, उपाध्यक्ष तथा सहसंयोजक ॲडव्होकेट अरुण धांडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचा प्रारंभ ज्येष्ठ गायक नीळकंठ कासार यांनी गणेश वंदना सादरीकरणाने केला. ‘मन रे तू काहे ना धीर धरे’ या गाण्याला कासारांना उत्फुर्त दाद मिळाली.दिलीप चौधरी यांनी गायलेल्या ‘काया ही पंढरी’ भक्तीगीत श्रोत्यांना खुप भावले.कु.दिव्या चौधरी यांनी गायलेल्या’ तुला पाहते रे, तुला पाहते’ या भावगीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले ! गायक सुनिल रत्नपारखी यांच्या ‘माझे माहेर पंढरी’ या गीताने भावविभोर केले ! गायक दिपक पाटील यांनी ‘ भक्ती वाचून मुक्तीची रे मज जडली रे व्याधी ‘ गायलेल्या गीताने श्रोत्यांना भक्तीरसात अक्षरशः न्हावून काढले ! ज्येष्ठ गायक नीळकंठ कासार यांनी ‘देवा तुझा मी सोनार’ या गीताने कार्यक्रम उंचीवर नेत श्रोत्यांना बेहोष केले ! एवढेच नव्हे तर ‘ देवा तुझा मी सोनार ‘ हे भक्तागीत कासार यांनी सादर केल्यावर श्रोत्यांमधील उषा सोनवणे भगिनीतील अंतर्यामी गायिका जागृत झाली ! भारावलेल्या उषा ताईंनी उत्स्फुर्तपणे ‘ तेथे कर माझे जुळती ‘ व अच्युतं केशवां ‘ ही भक्तीगीते सुरेल आवाजात गाऊन उपस्थितांना सुप्त गानकलेने स्तिमित केले ! त्यानंतर गायकवृंदांनी ‘ श्रीपाद वल्लभ दिगंबरा, माय भवानी, हे आदिमा हे अंतिमा, ज्योती कलश छलके, ठुमक चलत रामचंद्र, शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, हे भोळया शंकरा अशी एकाहून एक सरस अर्थघन गीते सादर करून ज्येष्ठांना भक्तीरसात न्हावू घातले.गायकांच्या सुमधूर आवाजाला संगिताचा अतूट साज हार्मोनियम वादक दिलीप चौधरी व तबला वादक निळकंठ कासार व सुनिल रत्नपारखी यांनी गायन सांभाळत दुहेरी साथसंगत केली.

गायक व वाद्यवृंद कलावंतांचे स्वागत व सत्कार संघाचे अध्यक्ष पंडितराव सोनार,उपाध्यक्ष ॲड.अरुण धांडे यांनी केला.पाडवा पहाट कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष पंडितराव सोनार व आभार प्रदर्शन ॲड.अरुण धांडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिव विकास बोरोले, उमेश पाटील,विश्वास सोनवणे, के.डी.पाटील यांनी अमूल्य सहकार्य केले.

Protected Content