
इंदोर (वृत्तसंस्था)। पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या महिन्यात भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईसंदर्भात राज्यसभेचे खासदार आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाची जुनीच भूमिका घेतली आहे. त्यांनी भारतीय हवाई दलाच्या कारवाईचे पुरावे जगापुढे ठेवावे, अशी मागणी अप्रत्यक्षपणे केली आहे.

ज्याप्रकारे अमेरिकेने ओसामा बिन लादेनवर केलेल्या कारवाईचे सबळ पुरावे जगासमोर ठेवले होते. त्याचप्रमाणे आपणही दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबाबत करायला हवे, असे सिंह यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, ‘भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईवर मी प्रश्न उपस्थित करत नाही. मात्र, या भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईचे सॅटेलाईटच्या माध्यमातून फोटो मिळणे शक्य आहे. ज्याप्रकारे अमेरिकेने ओसामा कारवाईचे सबळ पुरावे जगासमोर ठेवले. तसेच, सरकारनेही आपल्या भारतीय हवाई दलाने केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या बाबतीत करायला हवे.’ असेही ते म्हणाले.


