जळगाव, प्रातीनिधी | येथील संस्कार परिवार आणि श्री ओंकारेश्वर मंदिर देवस्थानतर्फे सोमप्रदोषदिना निमित्ताने सोमवारी (२९ जुलै) रोजी भव्य १०८ कावड यात्रा शहरात काढण्यात येऊन जिल्ह्यावर वरूण राजाची कृपा व्हावी याकरिता यावेळी साकडे घालण्यात आले.
चिमुकले राम मंदिर देवस्थान येथे सकाळी ६.३० वाजता दादा महाराज जोशी यांचे हस्ते कावडांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सर्व महिला तांब्याच्या २ कळसांसह जरीच्या कापडाने सजविलेल्या कावड घेवून यात्रेत सहभागी झाल्या. कळसांमध्ये नर्मदा, गंगा, समुद्र, गिरणा यांचे जल भरून सर्व १०८ कावड महिला घेवून यात्रेत सहभागी झाल्या होत्या. वारकरी भजन म्हणत टाळ, मृदुंगाच्या गजरात भक्तीमय वातावरणात सहभागी झालेत. यावेळी हर हर महादेव, ओम नमः शिवाय चा जप करीत यात्रेत हजारो भाविकही सहभागी झाले आहेत.स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक मार्गाने कावड यात्रा ओंकारेश्वर मंदिरात पोहचली. ओंकारेश्वर मंदिरात पोहोचल्यानंतर विधिवत पूजा, स्वागत केल्यावर कळसातील जलाद्वारे विधिवत मंत्रोचारात शिवपिंडीवर जलाभिषेक करण्यात आले. जळगाव जिल्ह्यावर वरूण राजाची कृपा व्हावी याकरिता यावेळी साकडे घालण्यात आले. यासाठी भाऊजी वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव, जळगावची सालासर भक्त मंडळ, अयोध्या नगर स्वस्तिक भक्त मंडळ हे सहभागी झाले होते. तसेच संस्कार परिवारच्या अध्यक्षा संतोष नवाल, समन्वयिका सुषमा झंवर, ओंकारेश्वर देवस्थानचे विश्वस्त जुगलकिशोर जोशी आदी सहभागी झाले होते.