नवी दिल्ली प्रतिनिधी । फलंदाज आणि विकेटकीपर दिनेश कार्तिक हा कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील त्रिनबागो नाइट रायडर्स या संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये दिसला होता. या संदर्भात बीसीसीआयकडून त्याला आचारसंहितेतील नियमांचा भंग केल्याने नोटीस बजावण्यात आली. नोटीसला उत्तर देत कार्तिकने आज बीसीसीआयची बिनशर्त माफी मागितली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कॅरेबियन प्रीमिअर लीगदरम्यान शाहरुख खान सहमालक असलेल्या त्रिनबागो नाइट रायडर्स संघाच्या जर्सीमध्ये तो ड्रेसिंग रुममध्ये दिसला होता. त्यावर बीसीसीआयने त्याला कारणे दाखवा नोटिस बजावली होती. बीसीसीआयच्या परवानगीशिवाय सीपीएलच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये तो सहभागी झाला होता. त्यावर बीसीसीआयने बजावलेल्या नोटिशीला कार्तिकने उत्तर दिलं आहे. प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमच्या विनंतीमुळे मी पोर्ट ऑफ स्पेनला गेलो आणि त्याच्याच आग्रहाखातर त्रिनबागोची जर्सी घालून सामना पाहिला. कार्तिकनं या चुकीसाठी माफीही मागितली. बीसीसीआयची परवानगी न घेतल्यानं मी बिनशर्त माफी मागतो. त्रिनबागोच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी नव्हतो आणि उर्वरित सामन्यांवेळी संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाणार नाही, अशी हमीही त्याने दिली. दरम्यान, कार्तिकने बीसीसीआयची बिनशर्त मागितल्यानंतर प्रशासकीय समितीकडून या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे.