मुंबईत कर्नाटकचा सत्ता संघर्ष ; काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांना हॉटेल बाहेर रोखले

karnataka

मुंबई (वृत्तसंस्था) कर्नाटक विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार मुंबईतल्या पवई येथील रेनेसाँ हॉटेलमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. या नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार मुंबईत दाखल झाले आहेत. शिवकुमार हॉटेल परिसरातही पोहोचले मात्र, त्यांना या आमदारांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले आहे.

हॉटेलमध्ये हे १० आमदार थांबले आहेत, त्याच हॉटेलमध्ये हे नेतेही पोहोचले आहेत. मात्र, शिवकुमार यांची काँग्रेसच्या आमदारांची भेट घेऊ शकतील का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. शिवकुमार यांना काँग्रेस आमदारांना भेटता येणार नाही, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, याच होटेलात आपण खोली बुक केल्याचे शिवकुमार यांनी सांगितले आहे. कुणालाही धमकी देण्याचा प्रश्न उद्भवत नसून, निर्माण झालेले मतभेद चर्चेने सोडवता येतील, आणि त्याचसाठी आम्ही आलो आहोत, असे शिवकुमार यांनी म्हटले आहे.

या विषयावर बोलताना शिवकुमार म्हणाले, “मुंबई पोलीस किंवा इतर सुरक्षा दल तैनात केले पाहिजे. त्यांना त्यांचे कर्तव्य करू द्या. आम्ही आमच्या मित्रांना भेटायला आलो आहोत. आम्ही राजकारणात एकत्रित आलो आहोत आणि राजकारणातही आपण एकत्रित मरणार आहोत. ते आमच्या पक्षाचे लोक आहेत. आम्ही त्यांना भेटायला आलो आहोत.” दरम्यान, काँग्रेसचे बंडखोर आमदार सोम शेखर यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले, त्यांनी केवळ आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, आपण काँग्रेस पक्षाचे नेते आहोत.

दरम्यान, काँग्रेस आणि जेडीएसचे नेते मुंबईत आल्याचे समजताच आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्रच या आमदारांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना लिहिले आहे. आमदारांच्या या पत्रानंतर हॉटेलाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर, हॉटेलात राज्य राखीव पोलीस दल आणि दंगलविरोधी पथकही तैनात करण्यात आले आहे.

Protected Content