डिजीटल मीडियाचा वापर करून युपीएससीत मिळविले यश-कांतीलाल पाटील ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । इंटरनेटवर अथांग ज्ञान असून यात विशेष करून युट्युब व टेलीग्राम अ‍ॅप्सद्वारे आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत झाली असून याचमुळे आपण युपीएससीमध्ये यश संपादन केल्याचे प्रतिपादन कांतीलाल सुभाष पाटील यांनी केले. नुकत्याच लागलेल्या निकालात त्यांची नागरी सेवेत निवड झाली असून लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपल्या यशाचा आलेख उलगडून सांगितले.

भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा या अगदी अंदाजे तेराशे लोकसंख्या असणार्‍या लहानशा गावातील कांतीलाल सुभाष पाटील या तरूणाने युपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा (आयएएस) परिक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. देशातून ४१८ वी रँक मिळवणार्‍या कांतीलालचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, लाईव्ह ट्रेंडस न्यूजने त्याच्या आजवरच्या वाटचालीला जगासमोर मांडण्यासाठी त्याची विस्तृत मुलाखत घेतली. यात त्याने अगदी भरभरून बोलत आपल्या आजवरच्या वाटचालीबाबत माहिती दिली.

सुभाष पाटील हे शेतकरी असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. कांतीलालचे सातवीपर्यंतचे शिक्षण हे गावातीलच जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत झाले. यानंतर त्याचे आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले. कॅटमध्ये चांगले गुण मिळवून त्याने नाशिक येथील के.के. वाघ अभियांत्रीकीत प्रवेश घेऊन बी.ई. पदवी संपादन केली. यानंतर गत चार वर्षांपासून तो युपीएससी परिक्षेची तयारी करत होता. यात तीनदा मेन्स परिक्षेपर्यंत धडक मारूनही तो यशस्वी होत नव्हता. यावर मंथन करून त्याने गेल्या वर्षी भुगोल हा ऑप्शनल विषय बदलून मानववंशशास्त्र म्हणजे अँथ्रॉपोलॉजी हा विषय घेतला. याचा लाभ होऊन यंदाच्या युपीएससी परिक्षेत त्याला देशातून ४१८वी रँक मिळाली आहे.

युपीएससी परिक्षेसाठी दररोज किती तास अभ्यास करावा ? असा प्रश्‍न विचारला असता कांतीलाल पाटील म्हणाले की, यासाठी दररोज किमान आठ ते नऊ तास अभ्यास आवश्यक आहे. यात द हिंदू व इंडियन एक्सप्रेस आदींसारखे महत्वाचे वर्तमानपत्र वाचण्यासाठीच (जे खूप आवश्यक आहे !) दररोज जवळपास दीड तास लागत असतो. यानंतर अभ्यास सुरू होतो. आपण स्वत: पुणे येथील वाचनालयात सकाळी नऊला गेल्यानंतर रात्री अकरालाच परतत होतो. हाच आपला गेल्या पाच वर्षांचा दिनक्रम होता अशी माहिती कांतीलाल पाटील यांनी दिली. नागरी सेवा परिक्षेसाठी मेहनत खूप आवश्यक असते. आत्यंतीक परिश्रमाशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे कांतीलालने डिजीटल माध्यमाचा या परिक्षेत यश मिळवण्यासाठी अतिशय उत्तम वापर करून घेतला.

या संदर्भात कांतीलाल म्हणाला की, इंटरनेट म्हणजे अथांग सागर आहे. यातील युट्युबवर तर खूप माहिती उपलब्ध असल्याचा विद्यार्थ्यांना खूप लाभ होतो. आपण स्वत: मिशन आयएएस या ग्रुपच्या युट्युबवरील व्हिडीओचा खूप लाभ झाल्याचे त्याने आवर्जून नमूद केले. तसेच मुलाखतीसाठी व्हाटसअ‍ॅप ग्रुपवरील मार्गदर्शन उपयोगी पडल्याचेही त्याने सांगितले. तथापि, परिक्षेचा अभ्यास सुरू असतांना आपण सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर होतो हे सांगण्यास तो विसरला नाही. डिजीटल माध्यमाचा परिक्षार्थींनी समर्पक वापर करावा असे मत त्याने व्यक्त केले आहे.

आपल्या आजवरच्या वाटचालीत कुटुंबाचा मोलाचा वाटा असल्याचे मत कांतीलालने व्यक्त केले आहे. युपीएससी परिक्षेचा निकाल लागल्यानंतर कुटुंबियांसह मित्रमंडळीला खूप आनंद झाला. सर्वात महत्वाचे म्हणजे संपूर्ण कठोरा गावालाच कलेक्टर झाल्यासारखे वाटत असल्याचे त्याने नमूद केले. आपण नागरी सेवेत जनतेची सेवा करण्यासाठी जात आहोत. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. याचमुळे इंजिनिअर असूनही आपण हा मार्ग निवडला असल्याचे कांतीलाल पाटील याने नमूद केले.

दरम्यान, कांतीलालच्या या यशात सर्वात मोलाचा वाटा असणारे त्याचे कुटुंब या यशाने अक्षरश: मोहरून गेले आहे. त्याचे वडील सुभाष पाटील, आई सौ. कल्पना पाटील व भाऊ रोहीत यांना त्याच्या यशाबद्दल खात्री होती. तथापि, तो इतकी झेप घेईल याचे त्यांना अप्रूप वाटत असल्याचे दिसून आले. तर समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यासाठी तपत कठोरा येथे अनेक मान्यवरांपासून ते सर्वसामान्यांपर्यंतची रांग लागल्याचे दिसून येत आहे. कांतीलाल सुभाष पाटील यांच्या वाटचालीसाठी लाईव्ह ट्रेंडस न्यूजतर्फे मन:पूर्वक शुभेच्छा.

खालील व्हिडीओत पहा कांतीलाल सुभाष पाटील व त्यांच्या कुटुंबियांशी केलेला वार्तालाप.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/772437263558840/

Protected Content