शेतकर्‍याचा मुलगाही आयएएस होऊ शकतो- ना. गुलाबराव पाटील ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । आजवर शहरातील मुलेच अधिकारी होतात असा समज होता. तथापि, कांतीलाल सुभाष पाटील यांनी काळ्या आईची सेवा करणार्‍या शेतकर्‍याचा मुलगा, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला आणि कोणताही क्लास न लावत युपीएससी उत्तीर्ण होऊन हा समज खोडून काढला आहे. शेतकर्‍याचा मुलगाही आयएएस होऊ शकतो असा आत्मविश्‍वास त्यांनी समाजाला दिला असल्याचे कौतुकोदगार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काढले. कांतीलाल पाटील यांचा सत्कार केल्यानंतर ते बोलत होते.

भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा येथील कांतीलाल सुभाष पाटील या तरूणाने यंदाच्या युपीएससी परिक्षेत यश संपादन केले आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज त्याचा हृद्य सत्कार केला. याप्रसंगी त्यांची वडील सुभाष पाटील, भुसावळचे नगरसेवक मनोज बियाणी व सामाजिक कार्यकर्ते राजू पारख यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी कांतीलाल पाटील यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, आमचे जुने सहकारी तथा जुने शिवसैनिक सुभाष पाटील यांच्या चिरंजीवांनी मिळवलेले यश हे अतिशय अभिमानास्पद आहे. खरं तर शहरातील मुलेच अधिकारी होऊ शकतात असे मानले जाते. पण शेतकर्‍याचा मुलगा, जिल्हा परिषदेत शिक्षण घेतलेला व कोणतेही क्लास न लावता यश संपादन केलेल्या कांतीलाल यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. जिल्ह्यातील तरूणांनी याचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे.

ना. पाटील पुढे म्हणाले की, कांतीलाल यांचे वय कमी असून ते पुढे अगदी सचिव पदापर्यंत शिखर गाठू शकतात. या वाटचालीत त्यांनी आपल्या मूळांना विसरू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कुटुंबाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद असल्याचे नमूद करत ना. गुलाबराव पाटील यांनी कांतीलाल पाटील यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

खालील व्हिडीओत पहा कांतीलाल पाटील यांच्या यशाबद्दल पालकमंत्र्यांचे कौतुकोदगार आणि भावी वाटचालीसाठी दिलेल्या शुभेच्छा.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/359908895013099/

Protected Content