Home Cities अमळनेर सात्री गावात कानबाई मातेची सवाद्य मिरवणूक; बोरी नदीत विसर्जन

सात्री गावात कानबाई मातेची सवाद्य मिरवणूक; बोरी नदीत विसर्जन

0
160


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देशाचे कुलदैवत आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कानबाई मातेचा उत्सव काल, सोमवारी, अमळनेर तालुक्यात ठीक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला. परंपरेनुसार, तालुक्यातील सात्री येथे कानबाई मातेचे विसर्जन बोरी नदी काठावर अत्यंत शांततेत पार पडले.

या उत्सवानिमित्त सात्री गावातून कानबाई मातेची बँड पथकाच्या साहाय्याने सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर आणि भक्तीमय वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीत संपूर्ण गाव सहभागी झाले होते. गावातील महिला, पुरुष तसेच लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वानी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. विशेषतः, महिलांनी पारंपरिक वेशभूषेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला, ज्यामुळे उत्सवाला एक आगळेच सौंदर्य प्राप्त झाले होते.

बोरी नदीच्या काठावर पोहोचल्यानंतर पारंपरिक पद्धतीने कानबाई मातेचे विसर्जन करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मातेला निरोप दिला. कोणताही अनुचित प्रकार न घडता, शांततेत आणि भक्तीमय वातावरणात हा उत्सव संपन्न झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. कानबाई उत्सवामुळे गावात एकोपा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


Protected Content

Play sound