रायपूर वृत्तसंस्था | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे कालीचरण महाराज यांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, महात्मा गांधी यांच्याबाबत धर्म संसदेमध्ये वादग्रस्त आणि आक्षेपार्ह भाषेत विधाने करणार्या कालीचरण महाराजांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान, छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी मध्य प्रदेशमधील खजुराहो येथून कालीचरण महाराजांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.
काही दिवसांपूर्वी झालेल्या धर्म संसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. रायपूरमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या धर्मसंसदेत बोलतांना त्यांनी पातळी सोडून केलेली टिपण्णी ही टिकेचे लक्ष्य बनली आहे. या व्हिडीओत कालीचरण महाराजानं गांधीजींना अपशब्द म्हटल्यानंतर नथूराम गोडसेचे आभार मानलेत. त्याच्या कृतीचं अभिनंदन केलंय. कॉंग्रेसच नाही तर अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींनी कालीचरण महाराजाविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली होती. यानंतर कालीचरण महाराज यांच्यावर ठिकठिकाणी गुन्हे नोंदविण्यात आले होते. रायपूर येथील गुन्ह्यात आता त्यांना अटक करण्यात आलेली आहे.
कालीचरण महाराज हे अकोला येथील रहिवासी असून त्यांचे मूळ नाव अभिजित धनंजय सराग होय. तारूण्यातच तो कालीचरण महाराज झाला. तोही आपण कालीमातेला आई तर अगस्ती ऋषींना गुरु मानत असल्याचं म्हणायला लागला. एकेदिवशी अकोल्यातल्या पुरातन शिवमंदीरात ह्याच कालीचरण महाराजानं शिवतांडव स्तोत्र म्हटलं आणि तो जगप्रसिद्ध झाला. मात्र यानंतर आक्षेपार्ह वक्तव्यांनी तो वादात सापडला असून आता त्यांना अटक करण्यात आली आहे.