


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार आणि खऱ्या अर्थाने लोकसेवक असलेले बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उद्या, बुधवार दिनांक ८ जुलै रोजी त्यांच्या अर्धकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी, जळगाव यांच्या वतीने या सोळाव्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा अनावरण सोहळा जुना खेडी रोडवरील शंकरराव नगर येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या प्रांगणात सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.
या सोहळ्याचे अनावरण भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषणजी गवई यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ असणार आहेत. याप्रसंगी केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे, माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य आ. एकनाथराव खडसे आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याला आमदार आ. राजूमामा भोळे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य आ. सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, महापौर दीपमाला काळे, आणि क.ब.चौ.उ.म.वि. जळगावचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी तसेच माजी कुलगुरू प्रा. एन. के. ठाकरे, प्रा. के. व्ही. पाटील, प्रा. आर. एस. माळी, मा. प्रा. शिवाजीराव पाटील आणि मा. प्रा. पी. पी. पाटील हे सत्कारमूर्ती व सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे यजमान तथा धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष शिरीष मधुकरराव चौधरी यांच्यासह संस्थेचे सचिव प्रा. डॉ. पी. आर. चौधरी, उपाध्यक्ष सुनील पाटील, खजिनदार निळकंठ काळे, सहसचिव पुरुषोत्तम पाटील व सर्व संचालक मंडळाने या सोहळ्याला आणि लोकसेवकाच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
जळगाव जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या १६ व्या पुण्यस्मरणार्थ उद्या, ८ जुलै रोजी धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीत त्यांच्या अर्धकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा माजी सरन्यायाधीश भूषण गवई आणि प्रमुख राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.



