केळी पीक विम्याच्या रकमेसाठी तापी नदीत उडी मारणे आंदोलनाचा इशारा

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील केळी पिक उत्पादकांना केळी पीक विम्याची रक्कम अद्यापपर्यंत मिळालेली नाही. वारंवार निवेदन व आंदोलन करून देखील अद्यापपर्यंत केळी पीक विम्याची कोणतीही रक्कम न मिळाल्याने २२ ऑक्टोबर रोजी  निंभोरासीम व पिंप्री नांदू येथील पुलावरून तापी नदीत उडी मारणे आंदोलनाचा इशारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात अश्या सुचना आमदार शिरीष चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून केले आहे.

दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात आमदार शिरीष चौधरी यांनी म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल हे दोन तालुके प्रमुख केळी उत्पादक तालुके आहेत. गेली काही वर्षे वादळ, अवकाळी पाऊस, सी.एम.व्ही. व विविध रोग यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांना यातून संरक्षण मिळावे म्हणून पीक विमा काढलेला असतो. पण यावर्षी ऑक्टोंबर महिना उजाडला तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मोडून पडलेला शेतकरी संतप्त झालेला आहे. त्यांनी आंदोलन व आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. व त्यामुळे मतदारसंघातील वातावरण प्रक्षुब्ध होत चालले आहे. शेतकरी संघर्ष समिती, रावेर च्या वतीने २२ ऑक्टोंबर २०२३ रोजी निंभोरासीम-पिंप्रीनांदू पुलावरून तापी नदीत उडी मार आंदोलन करणार असल्याचे आपल्या विभागाला निवेदन दिले आहे. तरी आपण या परिस्थितीची दखल घेवून तातडीने शेतकऱ्यांना विम्याची व सी. एम्. व्ही. रोगाची रक्कम मिळण्यासाठी पावले उचलावीत अश्या सुचना देण्यात आले आहे.

Protected Content