यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद महाजन होते. तसेच शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन, दीपाली धांडे मॅडम आणि पी.एस. सोनवणे, आयटीआयचे प्राचार्य गिरीश वाघुळदे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शरद जिवराम महाजन, पी.एस. सोनवणे व इतर मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थिनींनी सुंदर स्वागतगीत सादर केले. शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या स्पर्धेसाठी किरीओग्राफर सचिन भिडे, सूरज भालेराव आणि प्रतीक कोळी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना सोलो डान्स सादरीकरणाबाबत मार्गदर्शन केले. तसेच पी.एस. सोनवणे सरांनी देखील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शरददादा महाजन यांनी विद्यार्थ्यांना आपली संस्कृती आणि संस्कार जपण्याचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच त्यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अत्यंत सुयोग्य संचालन गौरी भिरूड मॅडम आणि लोखंडे मॅडम यांनी केले. या स्पर्धेत शाळेतील नर्सरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि आपल्या नृत्यकलेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पालकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका गौरी भिरूड आणि लोखंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप सौ. सरोज येवले यांनी आभार प्रदर्शन करून केला. संपूर्ण कार्यक्रम शाळेत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.