Home Cities जळगाव पत्रकार शरद भालेराव यांना ‘समाज चिंतामणी’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

पत्रकार शरद भालेराव यांना ‘समाज चिंतामणी’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे दै. ‘साईमत’चे उपसंपादक शरद भालेराव यांना ‘समाज चिंतामणी’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. युद्धजन्य परिस्थितीमुळे आयोजकांनी कार्यक्रमाच्या नियोजनात बदल केला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका छोट्याखानी कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, ‘सलाम’ काव्यसंग्रह पुस्तक, पेन, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी डाएट कॉलेजचे माजी प्राचार्य तथा माजी शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.डी. कोळी, सिंधूताई सपकाळ यांचे मानसपुत्र डी.बी. महाजन, कवी गोविंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शरद भालेराव यांना यापूर्वीही पत्रकारिता आणि सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये जळगाव जिल्हा पत्रकार संघ (२०१७), जळगाव-मौलाना आझाद फाउंडेशन (२०२०), चाळीसगाव येथील ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशन (२०२१), जळगाव-सेवक सेवाभावी संस्था (२०२१), छ. संभाजीनगर येथील सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवा संस्था (२०२१-२२) या पाच संस्थांतर्फे मिळालेल्या पुरस्कारांचा समावेश आहे. ‘समाज चिंतामणी’ राज्यस्तरीय पुरस्कार हा त्यांचा पत्रकारितेतील सहावा गौरव आहे.

त्यांनी पत्रकारितेची पदवी (बीसीजे) संपादन केली असून, २००२ पासून ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकारितेसोबतच त्यांनी सुवर्णकार समाज, विविध सामाजिक कार्य आणि अनेक पत्रकार संघटनांच्या माध्यमातून विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. समाज चिंतामणी प्रतिष्ठानने त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.

शरद भालेराव यांच्या निवडीबद्दल दै. ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे, साईमत मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक परेश बऱ्हाटे, कार्यकारी संपादक सुरेश उज्जैनवाल, वृत्तसंपादक छगनसिंग पाटील, वरिष्ठ उपसंपादक हेमंत काळुंखे यांच्यासह जिल्ह्यातील समस्त पत्रकार बांधव, सुवर्णकार समाज बांधव तसेच मित्र परिवार, नातेवाईकांसह सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound