Home Cities जळगाव गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ४ मे रोजी भव्य रोजगार मेळावा; युवकांसाठी सुवर्णसंधी

गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ४ मे रोजी भव्य रोजगार मेळावा; युवकांसाठी सुवर्णसंधी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली असून ४ मे २०२६ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आणि गोदावरी अभियात्रिकी महाविदयालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा होणार असून, देशभरातील नामांकित कंपन्या यात सहभागी होणार आहेत. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील युवकांना थेट नोकरीची संधी मिळणार आहे.

या रोजगार मेळाव्यात १०वी, १२वी, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग तसेच विविध पदवीधर उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार असल्याने इच्छुकांना एका ठिकाणी अनेक कंपन्यांसमोर स्वतःची पात्रता सादर करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी हा मेळावा विशेष उपयुक्त ठरणार असून, रोजगाराच्या संधी त्यांच्या दारात आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. कार्यक्रमस्थळीच नोंदणी व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्यामुळे उमेदवारांना स्वतंत्रपणे प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज भासणार नाही.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी बायोडेटा, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती तसेच ओळखपत्र (आधार कार्ड इत्यादी) सोबत आणणे आवश्यक आहे. योग्य कागदपत्रांसह उपस्थित राहिल्यास निवड प्रक्रियेत सहभागी होणे सोपे होणार आहे.

हा रोजगार मेळावा गोदावरी अभियात्रिकी महाविदयालय, , पी-५१, एम सेक्टर, अतिरिक्त एमआयडीसी, भुसावळ रोड येथे सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची उपस्थिती अपेक्षित असून, आयोजकांकडून सर्व सोयी-सुविधांची तयारी करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound