नवी दिल्ली वृत्तसंस्था । जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला करणाऱ्या काही गूंडांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी काही फोटोही पत्रकार परिषदेत सादर केले आहे. जॉय टिर्की डीसीपी क्राईम यांनी आज पत्रकार परिषद घेत सर्व माहिती दिल्ली पोलिसांनी पत्रकारांना सांगितली.
जेएनयु मधील हिंसाचार प्रकरणी अनेक प्रकराची चुकीची माहिती पसरवली गेली. एसएफआय, एआयएसए, एआयएसएफ आणि डीएसएफ या विद्यार्थी संघटनांनी काही विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यापासून रोखले. या विद्यार्थ्यांना धमक्या दिल्या जात होता. जेएनयु मधला हिंसाचार पूर्वनियोजित होता. त्यासाठी काही व्हॉट्सअॅप ग्रुपही तयार करण्यात आले होते. मास्क लावून ज्यांनी हल्ले घडवले त्यांना ठाऊक होते की कुठे हल्ले करायचे. कोणत्या खोल्या फोडायच्या. आत्तापर्यंत हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले नाही. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओंवरुन आम्ही काही आरोपींची ओळख पटवली आहे. यासंदर्भात आम्ही आत्तापर्यंत ३० ते ३२ साक्षीदारांशी चर्चा केली आहे असेही जॉय टिर्की यांनी स्पष्ट केले आहे.