मुंबई (वृत्तसंस्था) जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे करण्यात आलेल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. या तक्रारीवरून कुलाबा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेट वे ऑफ इंडिया येथे करण्यात आलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी सहभाग नोंदवला होता. यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही सहभागी झाले होते. जेएनयूमध्ये शांतता बैठक सुरू असताना काही गुंडांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. या घटनेनंतर देशातील इतर शहरांमध्ये याविरोधात निषेध करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यात आले होते. गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या आंदोलनात ‘काश्मीर को चाहिए आझादी’ अशा घोषणा देण्यात आल्याचा आरोपही भाजपाने केला होता. हे आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही हे आंदोलन करण्यात आले असून, मंत्र्यांविरोधात कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी सोमय्या यांनी तक्रारीत केली होती. या तक्रारीवरून कुलाबा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.