जळगाव प्रतिनिधी । घरकुलमध्ये शिक्षा ठोठावलेल्या भाजपच्या पाच नगरसेवकांसह महापालिका आयुक्तांना गुरुवारी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली असून आजपासून जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. यात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. यात घरकुल प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले नगरसेवक कैलास सोनवणे, गटनेते भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी व लता भोईटे यांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह पाचही नगरसेवकांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याची सुनावणी आजपासून सुरू होणार आहे.
या पाच नगरसेवकांना अपात्र करावे यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती; परंतु आयुक्तांनी अपात्र करण्याचा अधिकार नसल्याचा निर्णय देत महासभा, न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला होता. यानंतर प्रशांत नाईक यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात नेमके काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.