समांतर रस्त्याचे येत्या पंधरवाड्यात भूमिपूजन होणार – खासदार उन्मेष पाटील

jilhadhikari adhawa baithak

जळगाव प्रतिनिधी । महापालिका, एमएसईबी आणि नॅशनल हायवे यांनी समन्वय साधून येत्या आठ दिवसांत समांतर रस्त्याचे कामाला अंतिम रूप द्यायचे असून रस्त्याची गरज असताना व अरुंद रस्त्यामुळे नाहक निष्पाप लोकांचा बळी जातो आहे. आपण समन्वय साधत लवकर कामाला सुरुवात करा. येत्या पंधरवड्यात मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून हलगर्जीपणा केल्यास जनता तुमच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यास मागे पुढे पाहणार नाही, अशा सुचना खासदार उन्मेष पाटील यांनी समांतर रस्त्याचे कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित जिल्हा बैठकीत केला.

बैठकीत यांची होती उपस्थिती
नियोजन भवनात आज दुपारी दोन वाजता नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील व रक्षाताई खडसे यांच्या सूचनेने जिल्हा नियोजन भवनात नॅशनल हायवे, महापालिका, एमएसईबी, कृषी, अमृत योजना, समांतर रस्त्याचे अधिकारी यांच्यासह सर्व विभागांचे अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आढावा बैठकीला खासदार रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे होते. यावेळी आमदार राजूमामा भोळे, आयुक्त डॉ. उदय टेकाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हसकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जि.प.सदस्य प्रताप पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी बैठकीच्या नियोजना मागचा हेतू विषद करीत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या आपल्या विभागाचे काम अधिक जोमाने मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली.

जिल्ह्यातील दळणवळणास चालना मिळावी. जिल्ह्यात रस्ते व रेल्वेचे जाळे निर्माण व्हावे यासाठी जिल्ह्यात सुरु असलेली राष्ट्रीय व राज्य महामार्गांची तसेच रेल्वेची कामे तातडीने पूर्ण करावी. अशा सुचना खासदार उन्मेश पाटील यांनी सर्व संबंधितांना दिल्यात. जळगाव-चाळीसगाव, जळगाव-औरंगाबाद, जळगाव-धुळे, चाळीसगाव-नांदगाव या रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी नियोजन करावे. त्याचबरोबर जळगाव शहरातून जाण्याऱ्या राष्ट्रीय महामार्गाला समांतर रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी महानगरपालिका व महावितरण कंपनीने इलेक्ट्रीक पोल, पिण्याचे पाण्याची व सांडपाण्याची पाईप लाईन शिफ्टींगचे नियोजन लवकरात लवकर करावे. जिल्ह्यात पर्यटन विकासाला चालना मिळावी. याकरीता पुरातत्व विभागाकडे असलेल्या जिल्ह्यातील 11 वास्तूंचे संरक्षण व संवर्धनासाठी आराखडा तयार करावा. याठिकाणी पर्यटकांना द्यावाच्या मुलभूत सुविधांचा आराखडा तयार करावा. जळगाव शहरात सुरु असलेल्या अमृत पाणीपुरवठा व मल:निस्सारण योजनेचाही यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच चाळीसगाव-औरंगाबाद रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार करण्याची सुचनाही खासदार पाटील यांनी केली. त्याचबरोबर सध्या जिल्ह्यात रेल्वेच्या जळगाव-मनमाड तिसरी रेल्वे लाईन, जळगाव-भुसावळ तिसरी व चौथी लाईनची कामे सुरु आहे. तसेच जामनेर-पहूर शटल सेवा सुरु करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. तसेच भुसावळ, कजगाव व शिवाजीनगर येथे रेल्वे उ्डडाणपूल उभारणत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जळगाव औरंगाबाद रस्त्याच्या दुर्दशेला जबाबदार असलेल्याना पोलिस पाठवून उचलून आणावे लागेल — जिल्हाधिकाऱ्यांची हतबलता
जळगाव-चाळीसगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. पावसाळ्यात नागरीकांची गैरसोय होवू नये यासाठी या मार्गावरील लहान मोठ्या पुलांची कामे तातडीने पूर्ण करावी. तसेच जेथे बाह्यवळण रस्ता आहे. तेथे पावसाळ्यात अडचण येवू नये यासाठी या रस्त्यांचे मजबूतीकरण करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात. तसेच पोस्टामार्फत जिल्ह्यात सुरु असलेल्या पोस्टल बँकामध्ये शून्य बॅलेन्सवर आधारित शेतकऱ्यांचे खाते उघडता येऊन शेतकऱ्यांना‍ मिळणारी अनुदानाची व इतर रक्कम या खात्यांवर जमा करता येईल काय याबाबत डाक विभागाने अहवाल सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी देऊन त्यांनी जळगांव औरंगाबाद रस्त्याच्या कामा बाबत सुरू असलेली दिरगाई बाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की जळगाव औरंगाबाद रस्त्याच्या दुर्दशेला जबाबदार असलेल्याना पोलिस पाठवून उचलून आणावे लागेल कारण विदेशी पर्यटक व देशी पर्यटक याची या रस्त्याच्या कामा मुळे मोठी अडचण असून वाहनधारकांनी या रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे असल्याचे मला सांगितले तसा अनुभव मी देखील घेतला असल्याचे सांगितले

या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, सर्वांसाठी घरे, नागरीकांना केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध लाभाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, नाबार्डचे श्रीकांत झांबरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, महावितरणचे शेख, भुसावळचे उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, फैजपूरचे डॉ. अजित थोरबोले, राष्ट्रीय महामार्गचे श्री. शिंदे, पुरातत्व विभागाचे श्री. दानवे, रेल्वेचे रोहित मोरे आदिसह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बॅकांनी शेतकरी हितास प्राधान्य द्यावे – खासदार रक्षाताई खडसे
निसर्गाचा लहरीपणा व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता बँकांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सर्व पात्र शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्जाचे वाटप करावे. बँकांच्या अडवणूकीच्या धोरणामुळे कोणीही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही. याची दक्षता घेण्याच्या सुचना खासदार रक्षाताई खडसे यांनी आज दिल्यात. यावेळी बोलतांना खासदार खडसे म्हणाल्या की, शासनाच्या अनेक योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागत आहे. या योजनांच्या लाभासाठी शेतकरी व नागरीक ऑनलाईन अर्ज करण्यास जातात त्यावेळी सर्व्हरमध्ये अडचणी येत असल्याने ऑनलाईन अर्ज भरले जात नाही. अर्जाची मुदत संपल्याने शासनाच्या योजनांपासून लाभार्थी वंचित राहतात. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. खरीपाचा हंगाम सुरु झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने उपलब्ध व्हावे याकरीता बँकांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदतीचे धोरण ठेवावे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी जनजागृती करावी. तसेच पीकनिहाय पीक विम्याचे दर प्रत्येक सहकारी सोसायटीच्या बाहेर लावण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. नागरीकांना गावातच बँकीग सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी बँकांच्या शाखा वाढविण्याचे प्रस्ताव तयार करावे. सावदा व हिंगोणा येथील रेल्वे उडडाणपूलासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा. पाचोरा-जामनेर-बोदवड मार्गे मालवाहतुकीसाठी रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार करावा. यावेळी त्यांनी जळगाव व भुसावळ पासपोर्ट कार्यालयाचा आढावा घेतला.

Protected Content