जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा प्लॅस्टिकमुक्त होण्यासाठी केवळ शासन परिपत्रके, आदेश, दंडात्मक कारवाई एवढे पुरेसे नाही. तर त्यासाठी हे आपले सर्वांचे काम आहे असे समजून सर्वांनी त्यात स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवावा. हे काम दुस-यानंतर मी करेन अशी मानसिकता न ठेवता माझे काम सर्वांच्या अगोदर सुरू झाले पाहिजे. अशी मानसिकता सर्वानी ठेवल्यास जिल्हा खऱ्या अर्थाने प्लॅस्टिकमुक्त होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे केले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता हीच सेवा अभियानातंर्गत जिल्हा नियोजन भवनात आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. ढाकणे बोलत होते.
याप्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, निवासी उपजिल्हाधिकारी वामनराव कदम, विविध नगर पालिकांचे मुख्याधिकारी, विविध स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, डॉक्टर, शिक्षक, बचत गटांच्या महिला पदाधिकारी, अधिकारी, नागरिक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे हे पुढे म्हणाले की, प्लॅस्टिकमुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होतो, ते समस्त सजिवांना हानीकारक आहे. अशा गप्पा, चर्चा, मते-मतांतरे आपण विविध माध्यमांतून ऐकत असतो. परंतु आता केवळ गप्पा, चर्चा किंवा मते मांडण्यापेक्षा कृतीवर भर देण्याची वेळ आलेली असून आता यात उशिर झाल्यास याचे फार गंभिर परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागतील आणि त्या वाईट परिणामांना आपणच जबाबदार असणार आहे. तेव्हा आपण आपल्या भावी पिढीला काही चांगले देण्यासाठी आतापासूनच प्लॅस्टिक निर्मुलनासाठी वेगवान सुरूवात केल्यासच हे शक्य होणार आहे.
प्लॅस्टिकमुक्तीची किंवा निर्मुलनाची सुरूवात आम्ही आमच्यापासून अर्थात सर्व शासकीय कार्यालयापासून करणार असून लवकरच सर्व शासकीय कार्यालयाबाहेर या कार्यालयातील कोणीही अधिकारी तसेच कर्मचारी प्लॅस्टिक पिशव्या किंवा त्यापासून बनविलेल्या वस्तु वापरत नाहीत आणि या कार्यालयात कोणीही प्लॅस्टिक पिशवी घेवून प्रवेश करू नये असे फलक असतील. शहर आणि गावपातळीपर्यंत प्लॅस्टिक बंदी संदर्भात किंवा निर्मुलनासंदर्भात प्रचार व प्रसारासाठी शासकीय यंत्रणेसोबतच स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली जाईल असेही डॉ.ढाकणे यांनी शेवटी सांगितले.
प्रारंभी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी 2 ऑक्टोंबर 2014 पासून सुरू झालेल्या अभियानात देशपातळीवरील बक्षीसांमध्ये महाराष्ट्राला प्रथम पुरस्कार भेटला असून आपल्याला जिल्हा महाराष्ट्रात एक नंबरवर न्यायचा आहे. शहरात दररोज 200 मे.टन घनकचरा निघत असून त्यात 8 टक्के प्लॅस्टिकचा कचरा असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या लोकसंख्येचा विचार करता 5 लाख लोकांकडील कचरा निर्मूलनाचे काम 1 हजार सफाई कामगारांवर आहे आणि अशा परिस्थितीत 100 टक्के कचरा /प्लॅस्टिकचे उच्चाटन करावयाचे झाल्यास सफाई कामगारांबरोबरचे ती सर्व सामान्य नागरिकांचीही तेवढीची जबाबदारी असल्याचे मनपा आयुक्त डॉ. टेकाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी उपस्थितांमधून प्लॅस्टिक बंदी/निर्मुलनासंदर्भात सूचना देण्याचे आवाहन केल्यानंतर त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी,व्यापारी, शासकीय अधिकारी, मनपाचे अधिकारी. डॉक्टर्स, नागरिक इत्यादिंनी प्लॅस्टिक बंदी अधिक प्रभावीपणे राबविणे, काहींनी प्लॅस्टिकला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी कागदी तसेच कापडी पिशव्या तयार करणाऱ्या बचतगटांना अधिक प्रोस्ताहन देणे आणि समाज मन बदलविण्यासाठी पथनाट्य, विविध प्रसार माध्यमांद्वारे याचा प्रचार व प्रसार होण्यासाठी शासन, प्रशासन, आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रिकपणे प्रयत्न होण्यावर भर दिला पाहिजे अशा सुचना मांडल्या.
येत्या 18 व 19 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभांमधून गावपातळीपर्यंत याची प्रभावीपणे अंमलबजवणी करण्याच्या प्रचार प्रसारास सुरूवात करून सर्वांचा सहभाग घेवून प्लॅस्टिकमुक्त गाव, शहर आणि जिल्हा करून येत्या 2 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रपित्यास खऱ्या अर्थाने आदरांजली ठरावी अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यासह सर्वच मान्यवरांनी व्यक्त केली.