पराभूत उमेदवारांना शून्य मत : चोपड्यात चालला ‘हा’ पॅटर्न !

जळगाव, जितेंद्र कोतवाल | जिल्हा बँकेतील सर्वात चमकदार निकाल हा चोपड्यातील ठरला. सर्वच्या सर्व मते घेऊन महाविकास आघाडीचे घनश्याम अग्रवाल यांनी दणदणीत विजय संपादन केल्याची बाब ही प्रचंड आश्‍चर्यकारक असून हा चमत्कार नेमका कसा घडला ? ते जाणून घेऊया.

जळगाव जिल्हा बँकेतील काही निकाल हे आश्‍चर्यकारक वाटत आहेत. यात विकास सोसायटी मतदारसंघातून सर्वात मोठा विजय संपादन करणारे चोपडा येथील घनश्याम अग्रवाल यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मतदारसंघात एकूण ६४ मतदार होते. यापैकी ६३ मतदारांनी मतदान केले. हे सर्वच्या सर्व अर्थात ६३ मते घनश्याम अग्रवाल यांना पडली. तर त्यांचे विरोधक डॉ. सुरेश मन्साराम पाटील आणि संगीता पाटील यांना चक्क शून्य मते मिळाली. अर्थात १०० टक्के मते मिळवून त्यांनी ऐतिहासीक विजय मिळविला. आता हा चमत्कार घडला कसा ? ते जाणून घेण्याआधी चोपड्याच्या जागेवरून झालेला कलह लक्षात घ्यावा लागणार आहे.

चोपडा विकासोमधून गत पंचवार्षिकमध्ये डॉ. सुरेश शामराव पाटील यांनी प्रतिनिधीत्व केले होते. यामुळे त्यांचा यंदा देखील त्यांनी उमेदवारीची तयारी केली. त्यांच्यासाठी ही जागा कॉंग्रेसला सोडावी अशी मागणी स्थानिक पातळीवरून करण्यात आली. तथापि, याऐवजी यावल आणि रावेर या जागा कॉंग्रेसला सोडण्यात आल्या. तर चोपड्याची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली. ऐन निवडणुकीच्या काही दिवस आधीच भाजपमधून राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले घनश्याम अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली. यामुळे अखेर डॉ. सुरेश पाटील यांना शेतकरी पॅनलचा आश्रय घ्यावा लागला. तर संगीताबाई प्रदीप पाटील यांनी सुध्दा त्यांना आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सर्व प्रयत्न फोल ठरले.

घनश्याम अग्रवाल हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असून खडसे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अचूक वेळ साधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. अर्थात, खडसे यांचे पाठबळ सोबत असतांनाच त्यांना माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांची तगडी बॅकींग मिळाली. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी आमदार कैलासबापू पाटील, इंदिराताई पाटील यांची त्यांना साथ मिळाली. तर महाविकास आघाडी असल्यामुळे माजी आमदार तथा कॉंग्रेसचे सहसंपर्क प्रमुख प्रा. चंद्रकांत सोनवणे आणि कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांनी देखील आपली संपूर्ण ताकद घनश्याम अग्रवाल यांच्या सोबत उभी केली.

सर्वात महत्वाचे म्हणजे खुद्द घनश्याम अग्रवाल यांची अर्थशक्ती ही अतिशय भक्कम असल्याची बाब देखील विसरता येणार नाही. याचमुळे त्यांनी चोपडा विकासो मतदारसंघातून अक्षरश: एकहाती आणि एकतर्फी विजय संपादन केला. विद्यमान संचालकांना एका मत देखील मिळू न देण्याचा अनोखा विक्रम देखील त्यांनी केला. हा विजय अनेक वर्षांपर्यंत चर्चेत राहील हे मात्र निश्‍चीत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!