जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत छाननीच्या दिवशी राजकीय विरोधकांनी एकमेकांच्या अर्जांवर हरकती घेतल्या असून यावर आता काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत अर्ज भरण्याची तारीख उलटून गेल्यानंतर बुधवारी सायंकाळपर्यंत छाननी करण्यात आली. दिवसभरात अनेक उमेदवारांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी असल्याचा आरोप करून हरकती घेतल्या.
यात प्रामुख्याने मुक्ताईनगर मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अर्जावर हरकत घेण्यात आलेली आहे. यासोबत बोदवडमध्ये ऍड.रवींद्र पाटील, जळगावात महापौर जयश्री महाजन, मुक्ताईनगरात नाना पाटील, पाचोर्यात आमदार किशोर पाटील, अमळनेरमध्ये आमदार अनिल पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, चोपड्यात घनश्याम अग्रवाल, चाळीसगावमध्ये खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, इतर संस्था मतदारसंघात माजी मंत्री गुलाबराव देवकर, भुसावळमध्ये आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकती घेण्यात आल्या. दरम्यान, मुक्ताईनगरातून खासदार रक्षा खडसे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर सूचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात येणार असल्याचे संकेत देखील अर्ज छाननीतून दिसून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी आलेल्या हरकतींवर मतदारसंघनिहाय सुनावणी घेतली.
दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी विद्यमानल लोकप्रतिनिधींच्या अर्जावर लेखी आक्षेप घेतला असल्याने खळबळ उडाली आहे. आज जिल्हा बँकेत याबाबत निर्णय होऊन उमेदवारांची यादी फायनल होणार आहे. या निर्णयाविरोधात तीन दिवसांमध्ये नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे अपील करता येईल. त्यावर समाधान न झाल्यास संबंधीत उमेदवाराला न्यायालयात जाण्याचा पर्याय देखील खुला राहणार आहे. यामुळे आज काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.