विद्यार्थीनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणार्‍या शिक्षकाला पाच वर्षे सक्तमजुरी

भुसावळ प्रतिनिधी | इयत्ता चौथीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थीनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणार्‍या शिक्षकाला येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत वृत् असे की, तौसुफुद्दीन फरीदोद्दीन (रा.जळगाव) हा भुसावळ येथील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक २७ मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने १० फेब्रुवारी २०१६ रोजी सकाळी ८.३० वाजता शाळेतीलच चौथीच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला होता. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

या प्रकरणी तौसुफुद्दीन याच्यावर भुसावळ शहर पोलिस ठाण्यात विनयभंग व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. हा खटला भुसावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात चालवण्यात आला. आरोपीतर्फे जळगाव येथील ऍड.सागर चित्रे, तर सरकार पक्षातर्फे ऍड. विजय खडसे यांनी काम पाहिले. या खटल्यासाठी पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार शमीना तडवी यांनी काम पाहिले.

दरम्यान, या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर बुधवारी भुसावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एम.जाधव यांनी भादंवि ३५४ प्रमाणे एक वर्षे सक्तमजुरी तसेच पाच हजार रुपये दंड तसेच पोस्को कलमाप्रमाणे पाच वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Protected Content