पुलवामा मागे ‘जैश’चा हात नाही : पाकने दिले प्रमाणपत्र

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) एकीकडे भारतासमोर शांततेचा प्रस्ताव ठेवून साळसूदपणाचा आव आणत असलेल्या पाकिस्तानची कांगावाखोरी सुरूच आहे. पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सबळ पुरावे दिल्यानंतरही या हल्ल्यामागे जैश-ए- मोहम्मदचा हात असू शकत नाही, अशी ओरड सुरू केली आहे.

 

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अझहर याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी मसूद अझहरच्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेने स्वीकारली आहे, अशी विचारणा झाली असता जैश-ए- मोहम्मदने हे कृत्य केलेले नाही, असा दावा त्यांनी केला. “पुलवामा हल्ल्याबाबत आमच्या निकटवर्तीयांनी जैश-ए-मोहम्मदकडे विचारणा केली होती, मात्र त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला.” असे शाह मोहम्मद कुरैशी म्हणाले. मात्र जैशशी कुणी संपर्क साधला होता, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

 

दरम्यान, पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची चौफेर कोंडी झाली आहे. एकीकडे पाकिस्तान शांततेच्या बाता मारत असताना दुसरीकडे मसूद अझहरबाबतचा त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तान पुरावे मागत आहे. त्याचवेळी दुसरीकडे मसूद अझहर हा पाकिस्तानातच असून, तो आजारी असल्याने घरातून बाहेरही पडू शकत नाही, असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुरैशी करीत आहेत.

Add Comment

Protected Content