डॉ. जयेंद्र लेकुरवाळेंच्या व्याख्यानाने घेतला काळजाचा ठाव !

भुसावळ प्रतिनिधी । डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी द्वारकाई व्याख्यानमालेत गुंफतांना व्यक्त केलेल्या विचारांनी श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेतला. हे व्याख्यान ऑनलाईन प्रसारीत करण्यात आले.

भुसावळ येथील जय गणेश फाउंडेशनतर्फे तीन दिवसीय ऑनलाइन द्वारकाई व्याख्यानमाला घेण्यात आली. माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या मातोश्री स्वर्गीय द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा सांस्कृतिक उपक्रम राबवला जात आहे. त्यात बाप माझा सांगाती या विषयावर द्वितीय पुष्प गुंफताना प्रा. डॉ. लेकुरवाळे म्हणाले की, माय-बापात देव बघायला हवा. कारण ती संस्कारांची ऊर्जाकेंद्र आहेत. बापाचा जो खरबुडा हात पाठीवर फिरतो ना त्यात अनामिक शक्ती असते. ती शक्ती आयुष्याला दिशा दाखवते. बापातील आई ज्याने शोधली त्याची जीवनाची वेल सदाबहार असल्याशिवाय राहणार नाही. स्वत: दु:खाश्रू पिवून मुलांच्या डोळ्यात आनंद शोधणारा बाप आठवून पाहिला की उभारी मिळते, असेही डॉ. लेकुरवाळे म्हणाले. तसेच कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीवर मात करून जय गणेश फाउंडेशनने आयोजित केलेली ही ऑनलाइन व्याख्यानमाला राज्यातील अभिनव प्रयोग आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने सातासमुद्रापार हा उपक्रम पोहोचला आहे. माजी नगराध्यक्ष नेमाडेंच्या दूरदृष्टीला दाद दिली पाहिजे. सहा वर्षांपासून सुरू असलेला उपक्रम खर्‍या अर्थाने भुषावळचे भूषण आहे, असेही डॉ. लेकुरवाळे म्हणाले.

प्रास्ताविक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे, सूत्रसंचालन समन्वयक अरुण मांडाळकर, वक्त्यांचा परिचय सल्लागार गणेश फेगडे यांनी दिला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा ही व्याख्यानमाला ऑनलाइन घेण्याची संकल्पना राबवली जात आहे. त्यात बाप हा मुलाचा मित्र कसा असतो? हे डॉ. लेकुरवाळे यांनी स्वानुभव आणि कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला. द्वितीय पुष्प यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. गिरीश कोळी, प्रा. निलेश गुरूचळ, जय गणेश फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज पांडे, उपाध्यक्ष राहुल भावसेकर, सचिव तुषार झांबरे व पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Protected Content