जाणून घ्या… आषाढी एकादशीचे महत्त्व

vitthal rukmini photo

जळगाव प्रतिनिधी । संत ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण मनुष्य जीवाला सुखी करण्याची सोप्या, सुलभ साधनेला डोळ्यासमोर ठेवून प्रतिज्ञा केली होती. ते म्हणजे पंढरीची वारी, या वारीतील नित्यनेम म्हणजे नामस्मरण व हरिपाठ होय. या साधनेचे मुख्य व्रत ‘एकादशी’ आहे.

एकादशी हे व्रत असून ती अवस्था सुद्धा आहे. ‘व्रत एकादशी करीन उपवाशी गाईन अहर्निशी मुखी नाम’ वारकरी भाविकांच्या दृष्टीने एकादशी हे फक्त व्रत नसून ती एक उपासना आहे. म्हणून सर्व भाविक प्रत्येक महिन्यामध्ये येणारी एकादशी उपवासाने करतात. एक दशा म्हणजेच एकादशी होय. अंत:करणाचा एकच विषय असणे, सर्व इंद्रियांचा एकच विषय असणे, याला “एकादशी” म्हटले जाते.

सर्व एकादशीमध्ये महत्त्वाची आषाढी एकादशी मानली जाते. कारण ही एकादशी पांडुरंगाला खूपच आवडणारी असून देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. चातुर्मासाला या ठिकाणाहून प्रारंभ होतो. सर्व साधक व भक्तमंडळी चातुर्मासामध्ये नित्यनेम व साधना मोठ्या प्रमाणात करतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये साधना खूपच गरजेची असून त्याचा हा मुख्य कालावधी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून व इतर प्रांतांमधून सुद्धा वारकरी भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला येतात. पंढरपूरमध्ये आल्यानंतर दशमीला चंद्रभागेचे स्नान करून पंढरीला प्रदक्षिणापूर्ण केली जाते. लाखो भाविकांची या एकादशीला पंढरपूरमध्ये उपस्थिती असते. जीवनामध्ये आनंद प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाचा खूपच अट्टाहास असतो, परंतु इतर प्रयत्नातून आनंदाची प्राप्ती होत नसल्यामुळे माऊलींनी सर्व जीवाला आनंदी बनवण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. ‘किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी भजी जो आधी पुरूखी अखंडित’ मनुष्य देहातील जिवालाच आनंद प्राप्त करता येत असल्यामुळे त्याला वारी करण्याविषयी प्रवृत्त केले जाते. वारीतील सेवाभावातून नित्यनेम व एकादशी हे वृत्त वारकरी संप्रदायाने बंधनकारक सांगितलेले आहे. लौकिकातील एकादशीचा अर्थ आणि वारकरी संप्रदायातील एकादशीचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. आषाढी एकादशीला सर्वच वारकरी पंढरपूरकडे आपल्या प्राणप्रिय विठुरायाला भेटण्यासाठी सर्व अडचणी बाजूला ठेवून निघतात. विवेक आणि श्रद्धेचा समन्वय म्हणजेच वारकरी होय.

Protected Content