Home Cities जामनेर जामनेर तहसील कार्यालय झाले हायटेक! अद्ययावत सुविधांचे लोकार्पण !

जामनेर तहसील कार्यालय झाले हायटेक! अद्ययावत सुविधांचे लोकार्पण !


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जामनेर तहसील कार्यालयात विविध अद्ययावत सुविधांचा शुभारंभ करण्यात आला. माजी नगराध्यक्षा मा. साधनाताई गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते या नूतनीकरण केलेल्या अभ्यागत कक्ष, आवक-जावक कक्ष आणि (क्यूआर) कोड वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी तहसील कार्यालयात अद्ययावत आवक-जावक कक्ष, योजनादूत कक्ष तसेच सुसज्ज अभ्यागत कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. अभ्यागत कक्षामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी आरामदायक बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या कक्षातील QR (क्यूआर) कोड वाचनालयामुळे नागरिकांना विविध प्रकारची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.

याव्यतिरिक्त, योजनांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची सोय देखील करण्यात आली आहे. कार्यालयाच्या आवारातील भिंतींवर जमीन व्यवहार धोरणासंबंधी कायद्याची माहिती गोष्टीरूपात फ्रेम्समध्ये लावण्यात आली आहे. तसेच, गावनिहाय तलाठी भेटीचे वेळापत्रक QR (क्यूआर) कोडच्या माध्यमातून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना शासकीय कामकाज अधिक जलद आणि सोयीचे होणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ही संकल्पना जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आणि उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आली आहे. या सोहळ्याला तहसीलदार नानासाहेब आगळे, नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर, नायब तहसीलदार माया शिवदे, नायब तहसीलदार किशोर माळी, मंडळाधिकारी विष्णू पाटील, मंडळाधिकारी विजय पाटील, तलाठी ईश्वर कोळी, कोतवाल संतोष कोळी यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound