जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतांना धारीवाल पॉलीटेक्नीकमधील कोविड केअर सेंटरमधील रूग्णांनी पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जामनेर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला आहे. शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यातच आता चक्क कोरोना बाधीत रूग्णांनीच कोविड केअर सेंटरमधून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जामनेर तालुक्यातील पळासखेडा शिवारात असलेल्या धारीवाल पॉलीटेक्नीकमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. येथे ५० रूग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढली असल्यामुळे हे सेंटर सध्या फुल्ल भरले आहे. मात्र येथे रूग्णांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत रूग्णांनी गोंधळ घातला. यानंतर येथील ५० पैकी १५ रूग्ण घरी निघून गेले आहेत.
दरम्यान, कोरोना बाधीत रूग्णांनी रूग्णालयातून पलायन केल्याची माहिती समोर येताच खळबळ उडाली. या संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा प्रकार घडल्याला दुजोरा दिला. मात्र रूग्णालयात चांगली सुविधा असतांनाही काही रूग्णांनी घरी जाण्याचा आग्रह धरून गोंधळ घातला. येथे वेळेवर नाश्ता, जेवण आदी सुविधा मिळत असतात. मात्र असे असूनही येथून काही रूग्ण घरी निघून गेले आहेत. या संदर्भात आम्ही पोलीस स्थानकात तक्रार दिल्याची माहिती देखील डॉ. सोनवणे यांनी दिली.