जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपल्या सहकारी महिलाचा विनयभंग केल्याच्या आरोपातून पहूर रूग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी जितेंद्र वानखेडे यांना न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, पहूर येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ.जितेंद्र प्रल्हाद वानखेडे यांनी आपल्या सहकारी महिला डॉक्टरची छेड काढल्याचे प्रकरण खूप गाजले होते. डॉ. जितेंद्र वानखेडे कामावर नसताना दोन जून २०२१ रोजी मध्यरात्री रुग्णालयात गेले. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त तुमच्यासाठी नॉनव्हेज आणले असल्याचे सांगून मध्यरात्री महिला वैद्यकीय अधिकारी झोपलेल्या खोलीचा दरवाजा ठोठावला. महिला डॉक्टरने नकार देऊनही बराचवेळ डॉ.जितेंद्र वानखेडे दरवाजा ठोठावत होता. त्यामुळे महिलेने दार उघडून पार्सल घेऊन दरवाजा बंद केला.
यावेळी डॉ.वानखेडेने मद्यप्राशन केले होते. त्यानंतर पुन्हा वारंवार फोन करून येण्याचा आग्रह केला. घाबरलेल्या संबंधित महिला डॉक्टरने अन्य सहकार्यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायाधीश डी.एन. चामले यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात डॉ. वानखेडे यांनी सहकारी वैद्यकीय अधिकारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ऍड. कृतिका भट यांनी बाजू मांडली.