शिवसेना सहसंपर्क प्रमुखपदी डॉ. मनोहर पाटील !

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेनेच्या रावेर लोकसभा सहसंपर्क प्रमुखपदी पक्षाचे निष्ठावंत नेते डॉ. मनोहर पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पक्षातर्फे विविध नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात आता रावेर लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्क प्रमुखपदाची धुरा ही डॉ. मनोहर पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. डॉ.मनोहर पाटील हे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक असुन गेल्या ३७ वर्षांपासून जामनेर तालुक्यात शिवसेनेची धुरा सांभाळत आहेत. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत जिल्हात सर्वात कमी मतांनी पराभूत होऊन,१९९५ विधानसभेला शिवसेना-भाजपा युतीत विधानसभेचे टिकीट कापले तरीही आज पर्यंत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाशी एकनिष्ठ राहिल्याने त्यांच्या निष्ठेची पावती मिळाल्याने जामनेर सह रावेर लोकसभा मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

दरम्यान, शिवसेनेने आधीचे सहसंपर्क प्रमुख असणारे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे पद काढून ते डॉ. मनोहर पाटील यांना दिले आहे. डॉ. मनोहर पाटील यांची पक्षाने अनेकदा उपेक्षा केल्याचा आरोप करण्यात येत होता. या अनुषंगाने आता सहसंपर्क प्रमुखपद देऊन त्यांना मानाचे स्थान देण्यात आल्याचे मानले जात आहे.

Protected Content