Home धर्म-समाज मलकापूर नगरपरिषदेत निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या सन्मानार्थ जमाअत-ए-इस्लामी हिंदचा सत्कार समारंभ

मलकापूर नगरपरिषदेत निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या सन्मानार्थ जमाअत-ए-इस्लामी हिंदचा सत्कार समारंभ


मलकापूर-वृत्तसेवा | मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत विविध राजकीय पक्षांतून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवक व नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांच्या सन्मानार्थ जमाअत-ए-इस्लामी हिंद, शहर मलकापूर यांच्या वतीने भव्य, सुसंस्कृत आणि वैशिष्ट्यपूर्ण सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. कोणताही धर्म, जात अथवा पक्षभेद न ठेवता विविध पक्षांतील व विविध धर्मांतील लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली. परस्पर बंधुता, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक सलोख्याचे हे कार्यक्रमाने उत्तम उदाहरण घडवले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुहेल अमीर शेख (सदस्य, शूरा समिती, जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र प्रांत) होते. प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुलरशीद जमदार तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतीक अहमद जोवारीवाला उपस्थित होते. विविध पक्षांतून निवडून आलेले सर्व नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमात नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला. नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी आपल्या भाषणात जनसेवेचा ठाम संकल्प व्यक्त करत शहराचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हीच आपली सर्वोच्च प्राधान्ये असल्याचे स्पष्ट केले.

जमाअत-ए-इस्लामी हिंद, शहर मलकापूर यांच्या वतीने सर्व यशस्वी उमेदवारांना वचनपत्र देण्यात आले. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रस्ते व वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी तसेच इतर नागरी प्रश्न नैतिक जबाबदारी समजून प्रामाणिकपणे सोडवण्याचे आश्वासन निवडून आलेल्या प्रतिनिधींनी यावेळी दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुस्तकीम अहमद यांनी केले. त्यांनी या सत्कार समारंभामागील उद्देश आणि जमाअत-ए-इस्लामी हिंद यांच्या सामाजिक व सुधारक भूमिकेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाची सुरुवात हाफिज साहेबांच्या प्रभावी कुरआन पठणाने झाली. त्यानंतर त्याचा उर्दू व मराठी भाषेत अनुवाद सादर करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात सुहेल अमीर शेख यांनी नवनिर्वाचित प्रतिनिधींना शुभेच्छा देत सांगितले की, निवडणुकीतील विजय हा सन्मानासोबतच मोठे दायित्व घेऊन येतो. हे दायित्व प्रामाणिकपणा, न्याय आणि सेवाभावनेने पार पाडणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. नागरिकांनीही निवडून आलेल्या प्रतिनिधींना सहकार्य करावे व आपल्या मागण्या सुसंस्कृत पद्धतीने मांडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

शांतता, बंधुता आणि न्याय हीच कोणत्याही शहराची खरी ओळख असते. मलकापूर या दिशेने एक आदर्श शहर म्हणून पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात मान्यवरांचे जंगी स्वागत करून भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. सायंकाळी ८ ते १० या वेळेत पार पडलेल्या या समारंभास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परस्पर सलोखा, लोकशाही मूल्ये आणि जनसेवेची भावना वृद्धिंगत करणारा हा सत्कार समारंभ यशस्वी व स्मरणीय ठरला.


Protected Content

Play sound