जळगाव प्रतिनिधी । वीक-एंड लॉकडाऊनच्या दुसर्या दिवशी शहरातील बहुतेक भागांमध्ये सामसूम असतांना चौघुले प्लॉट भागात जुन्या वादातून दोन गट एकमेकांना भिडले असून यात एका गटाने फायरिंग केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली आहे.
याबाबत वृत्त असे की, शनिपेठेतील चौघुले प्लॉट परिसरात आज दुपारी दोन गटांमध्ये धुमश्चक्री झाली. या भागातील सारवान आणि शिंदे या दोन्ही गटांमध्ये जुना वाद असून यातूनच आज दुपारी राडा झाला. याप्रसंगी एका गटाने फायरिंग केल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गोळी झाडल्यानंतर दोन्ही गटाच्या तरूणांनी घटना स्थळावरून पलायन केले.
दरम्यान, ही माहिती मिळताच शनिपेठसह एलसीबीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चौकशीला प्रारंभ केला आहे. फायरिंग केल्यानंतर खाली पडलेले कार्टीरेज पोलिसांना आढळून आले असून ते पंचनामा करून ताब्यात घेण्यात आलेले आहे. तर अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी देखील घटनास्थळाची पाहणी करून सहकार्यांना तपासाबाबत सूचना दिल्यात.
चौघुले प्लॉटमधील गोळीबारात दोन्ही गटाच्या संशयितांबाबत माहिती जमा करण्यात आले असून संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.