संभाजी भिडेंवर कारवाईचे जयंत पाटलांचे संकेत

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना आजारच नाही. हा आजार झालेले लोक जगण्याच्या लायकीचे नाहीत असे सांगणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कारवाईचे संकेत ज़लसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत

 

कोरोना संसर्ग होणाऱ्या नागरिकांविषयी  संभाजी भिडे यांनी  वादग्रस्त वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या संकटकाळात राज्य सरकार आणि समाज एकत्रित प्रयत्न करत असताना दिशाभूल करणारी वक्तव्यं करणं अयोग्य आहे. अशी वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत. त्यांच्या विधानांची तपासणी करुन आवश्यकता वाटल्यास अशी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,” असं सांगत संभाजी भिडे यांना इशारा दिला.

 

सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानावरही भाष्य केलं. “कोरोना संकटकाळात समाजात गैरसमज करणारी वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत. सध्या अनेकांना बाधा झाली आहे. एवढ्या मोठ्या संकटाच्या काळात अशाप्रकारची वक्तव्य करुन लोकांची दिशाभूल केली जात आहे. हे अयोग्य आहे. सध्या राज्य सरकार आणि समाज संकटाचा सामना करत आहे. अशावेळी आंबे खाल्ल्यावर मुलं होतात, अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून गैरसमज करणारी विधानं होत असतील, तर ते अयोग्य आहे,” असं पाटील म्हणाले.

 

“एरवी अशी वक्तव्यं खपून जातात. पण सध्याच्या परिस्थितीत अशा वक्तव्यांमुळे त्या संकटाचं गांभीर्य कमी होतं. कोणीही उठून काहीही बोलायला लागलं तर सरकार आणि समाजाकडून सुरु असणाऱ्या प्रयत्नांमध्ये बाधा निर्माण होईल. त्यामुळे अशी वक्तव्यं कायद्याच्यादृष्टीने तपासून त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे. संभाजी भिडे पुन्हा अशाप्रकारचं अनाठायी  विधान करणार नाहीत,” असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

 

“मुळात कोरोना हा रोग नाही. कोरोनानं माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत.  हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही. दारुची दुकानं उघडी …त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला आहे, त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही,” असं संभाजी भिडे म्हणाले होते.

 

Protected Content