Home क्रीडा जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर अंतिम सामन्याचा थरार 

जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर अंतिम सामन्याचा थरार 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । २०-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी जळगावकरांसाठी खास सोय करण्यात आली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या या बहुप्रतिक्षित अंतिम लढतीचे थेट प्रक्षेपण जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौक येथे भव्य एलईडी स्क्रीनवर दाखविण्यात येणार आहे. आमदार सुरेश भोळे, युवाशक्ती फाउंडेशन आणि शौर्यवीर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून क्रिकेटप्रेमींना मोठ्या पडद्यावर सामन्याचा रोमांच अनुभवता येणार आहे.

देशभरात सध्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने येणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक क्षणाचा आनंद एकत्रितपणे घेता यावा यासाठी जळगाव शहरात रविवार, ८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेपासून १० बाय २० फूट अशा मोठ्या एलईडी स्क्रीनवर सामन्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

काव्यरत्नावली चौक येथे दुपारी साडेबारापासूनच या कार्यक्रमाची तयारी सुरू होणार असून सामना संपेपर्यंत नागरिकांसाठी प्रक्षेपण सुरू राहणार आहे. या ठिकाणी क्रिकेटप्रेमींना आनंददायी वातावरणात सामना पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमात डीजेवरील गाण्यांचा जल्लोष, पंजाबी ढोलचा उत्साह आणि आकर्षक आतषबाजी यामुळे सामन्याचा आनंद अधिक द्विगुणित होणार आहे.

कार्यक्रमस्थळी तिरंगा ध्वजांची सजावट, सेल्फी पॉइंट तसेच डिस्को जॉकीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. नागरिकांनी सहकुटुंब येऊन आरामात सामना पाहावा यासाठी बसण्याची स्वतंत्र सोयही आयोजकांनी केली आहे. त्यामुळे शहरातील क्रिकेटप्रेमींना सामन्याचा थरार एका उत्सवी वातावरणात अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

रविवारच्या सुट्टीमुळे या सामन्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. काही जण कुटुंबासह घरी बसून सामना पाहण्याचे नियोजन करत असताना अनेक मित्रमंडळी एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी हा सामना पाहण्याचा आनंद घेणार आहेत. त्यामुळे शहरात क्रिकेटचा जल्लोष अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.

युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष विराज कावडिया यांनी जास्तीत जास्त जळगावकर नागरिक व क्रिकेटप्रेमींनी काव्यरत्नावली चौक येथे उपस्थित राहून या ऐतिहासिक सामन्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे. कार्याध्यक्ष प्रीतम शिंदे यांनी देखील या आयोजनासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound