मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी जिल्हा परिषद गटांसाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या केव्हा होणार याबात संभ्रमाचे वातावरण आहे. कारण प्रभाग रचनांवरून सुप्रीम कोर्टात याचिका प्रलंबीत असून यासोबत ओबीसी आरक्षणाचा तिढा देखील सुटलेला नाही. यामुळे निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अर्थात, निवडणुकांबाबत संभ्रम असला तरी निवडणूक आयोगाने निवडणुकांची जय्यत तयारी केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. याबाबत राजपत्रात देखील अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यामधील ३४ नगरपालिकांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर केले असून यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण गटासाठी खुले निघाले आहे. अर्थात, जि.प. अध्यक्षपद हे अनारक्षीत असल्यामुळे यासाठी आता प्रचंड चुरस निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिलीप खोडपे यांच्या नंतर जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे महिलांनीच भूषविले आहे. आता अध्यक्षपद हे सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने यावर पुरूष सदस्य विराजमान होण्याची शक्यता यातून बळावल्याचे दिसून येत आहे. यामुळे आगामी जि.प. निवडणुकांमधील चुरस ही प्रचंड प्रमाणात वाढणार असल्याचेही अधोरेखीत झाले आहे.