पोषण आहार घोटाळा : अधिकारी-मुख्याध्यापकांची वेतनवाढ रोखली

जळगाव प्रतिनिधी | शालेय पोषण आहार योजनेच्या चौकशीमध्ये ठेकेदाराला बिलापेक्षा तब्बल १ लाख ६७ हजार रुपये जास्ती दिल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी १४ जणांची वेतनवाढ रोखली असून यात पाच अधिकार्‍यांसह नऊ मुख्याध्यापकांचा समावेश आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

जिल्हा परिषदेतेतील शालेय पोषण आहार योजनेतील अपहार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यामुळष उघडकीस आणला होता. त्यांनी शालेय पोषण आहार योजनेतील उघड गैरव्यवहार शोधण्यासाठी चार तालुक्यातील पोषण आहार योजनेची चौकशी केली होती. सन २०१७ या एका वर्षात जळगाव, चाळीसगाव, भडगाव, मुक्ताईनगर या चार तालुक्यातील पोषण आहार योजनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने अहवाल सादर केला तोपर्यंत सीईओ दिवेगावकर यांची बदली झाली होती.या समितीने दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्यास प्रशासनाकडून चालढकल केली जात होती. कारवाईचा दबाव वाढल्याने वारंवार अहवाल बदल करून ठेकेदाराकडून अतिप्रदान रक्कम परत घेण्यात आली होती. या चौकशीमध्ये शिक्षण विभागाने वस्तुनिष्ठ अहवाल २० मे २०१९ रोजी सादर केला होता. मात्र यात दोषी आढळून आलेल्यांवर कारवाई करण्यात आली नव्हती.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या प्रकरणाला गती दिली. यातूनच दोषी असलेल्या तत्कालीन ५ गटशिक्षणाधिकारी व ९ तत्कालीन मुख्याध्यापकांवर एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई झालेल्यांमध्ये जे.डी. पाटील (तत्कालीन विस्तार अधिकारी, मुक्ताईनगर), एस.पी. विभांडिक (विस्तार अधिकारी, चाळीसगाव), आर.व्ही. बिर्‍हाडे (विस्तार अधिकारी, जळगाव), कल्पना चव्हाण (गटशिक्षणाधिकारी, जळगाव) या पाच अधिकार्‍यांचा समावेश आहे.

यासोबत सुलोचना साळुंके (ग्रेडेड मुख्याध्यापक, गिरड, ता. भडगाव), सुनंदा महाजन (मुख्याध्यापक, चांगदेव, ता. मुक्ताईनगर), सुरेश सुरवाडे (मुख्याध्यापक, चिंचोळ, ता. मुक्ताईनगर), सुपडू हेरोळे (नांदवेल, मुक्ताईनगर), जबीउल्ला शाह अताउल्ला शाह (मुख्याध्यापक, उर्दू शाळा, वढोदा, मुक्ताईनगर), राजेंद्र अडावदकर (मुख्याध्यापक, मांदुर्णे, ता.चाळीसगाव), मिलिंद कोल्हे (मुख्याध्यापक, रायपूर, ता. जळगाव), नाहिदा अंजुम शेख सलीम (मुख्याध्यापक), निहकत अंजुम नाजिमोद्दीन (मुख्याध्यापक) या तत्कालीन मुख्याध्यापकांचा समावेश आहे. डॉ. पंकज आशिया यांच्या या धडक कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Protected Content